कुपवाड : श्रीकांत मोरे
एमआयडीसी, मोलमजुरीत राब राब राबून, पोटाला चिमटा घेऊन ज्यांनी पोरांना शाळा कॉलेजात घातलं, त्यांच्या डोळ्यादेखत पोरं तुरुंगात जायला लागली आहेत. दिवसभर उनाडक्या आणि टवाळखोरी करत फिरणार्या पोरांची गुन्हेगारापर्यंतची वाटचाल संपूर्ण कुपवाड आणि परिसरासाठी गंभीर बनली आहे. गरीब घरातल्या कर्त्या पोरांचा शिक्षण सोडून गुन्हेगारीपर्यंतचा हा प्रवास भयंकर आहे.
अजून मिसरूड पण फुटलं नाही अशी पोरं आज कुपवाड शहर, एमआयडीसी परिसरात गुंडगिरी करताना सापडत आहेत. दिवसभर टवाळक्या करायच्या, अड्डा तयार करायचा, तिथं बसून याचा हिशोब करतो आणि त्याला बघून घेतो, अशी भाषा करायची. चार टाळकी जमली की हत्यार काढायचे आणि सरळ कुणाची तरी डोकी फोडायची इतकी टोकाची गुंडगिरी कुपवाडमध्ये वेगाने पसरत आहे. शालेय वयातच पोरांची पावले गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत. घरात कसलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेली आणि कष्टकरी, गरीब आईबापांची पोरं आज सर्रास गुन्हेगारीकडे वळली आहेत. चांगले शिकून नाव कमावण्याऐवजी ‘गुन्हेगार’ म्हणून काळ्या यादीत नावे जाणार्या या पोरांचे भवितव्य काय, हा गंभीर सवाल उपस्थित होता आहे.
शहरातील रेकॉर्डवरचे गुन्हेगार सांगली, कोल्हापूर आदी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. आणि तरीही कुपवाड शहरासह विस्तारित परिसरात गुन्हेगारीचा आलेख चढताच राहिला आहे. याचे कारण काय? सर्व गुन्हेगार जर शिक्षा भोगत आहेत तर मग किरकोळ कारणावरून खून, खूनाचा प्रयत्न, मारामारी, चाकू, कोयत्याचे हल्ले कसे होत आहेत आणि ते कोण करत आहेत? याचे उत्तर घटनांपेक्षाही भयंकर आहे. ते म्हणजे या प्रकरणात नवीनच गुंडांची नावे समोर येत आहेत. या गुन्ह्यांमध्ये मिसरूड न फुटलेल्या शालेय, महाविद्यालयीन तरुणाईचा सहभाग दिसून येत आहे. किरकोळ कारणावरून बिथरणारी, सहज हत्यारे जवळ बाळगणारी ही तरुण पोरं असल्याच टवाळखोर मित्राच्या साथीने गुन्हेगारीत अडकली आहेत.
काही महिन्यांपासून शहरासह विस्तारित परिसरात जे गुन्हे घडत आहेत, त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराऐवजी ज्यांच्यावर अजून कसलेही गुन्हे दाखल नाहीत असे नवीन तरुण गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर येत आहेत. ही सर्व तरुणाई गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे आई-वडील रोजंदारी, शेतमजूर, मोलमजूर, एमआयडीसीतील विविध कारखान्यात कामगार म्हणून काम करीत आहेत.
अनेक तरुण दारू, मावा, गुटखा, गांजा या अमलीपदार्थांच्या आहारी गेले आहेत. कॉलेजला म्हणून जायचे आणि शहरातच टवाळक्या करत बसायचे हा रोजचा उद्योग सुरू आहे. नवखा तरुण गुन्हा करून कारागृहात गेला आणि जामिनावर बाहेर आल्यावर त्याच्यात सुधारणा होण्याऐवजी गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. किरकोळ कारणावरून गटागटात, मित्रांमध्ये वादावादीचे प्रकार होऊन खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, धमकावणे असे प्रकार घडत आहेत. त्यावर वचक ठेवण्यात पोलिस प्रशासन कुचकामी ठरत आहे.
शहरासह विस्तारित परिसरातील अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार विविध कारागृहात शिक्षा भोगत आहेत. तर काही टोळ्या सांगली, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्ह्यांतून हद्दपार केले आहेत.