कोल्हापूर : गर्भलिंग निदान टोळीचा सूत्रधार डॉक्टर, साथीदार सराईत गुन्हेगार
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणार्या टोळीतील मुख्य संशयित डॉ. हर्षल रवींद्र नाईक-परुळेकर (रा. फुलेवाडी, रिंगरोड) व साथीदार विजय कोळसकर (रा. मडिलगे खुर्द, ता. भुदरगड) हे पोलिस रेकॉर्डवरील सराईत असल्याचे करवीर पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. दोघांवर यापूर्वी भुदरगड, पन्हाळा व राधानगरी पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत.
संशयितांनी सोनोग्राफी मशिन, गर्भपाताच्या गोळ्या खरेदी केल्या आहेत. मशिन, गोळ्या पुरवठा करणार्या संशयितांचा शोध घेण्यात येत आहे, असे करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. गुन्ह्याची वाढती व्याप्ती लक्षात घेता आणखी काही संशयितांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
संशयित जेरबंद डॉ. नाईक- परुळेकर, एजंट विजय कोळसकर, युवराज चव्हाण (रा. प्रयाग चिखली, ता. करवीर), संजय पाटील (वरणगे पाडळी, ता. करवीर) यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलिसी खाक्या दाखविताच चौघांनीही तोंड उघडले आहे. चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागत असल्याचेही सांगण्यात आले.
सोनोग्राफी मशिन कोणाकडून व केव्हा खरेदी केले. आजवर किती महिलांची गर्भनिदान चाचणी करण्यात आली, याचीही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात राधानगरी, भुदरगड तालुक्यांतील काही संशयितांची नावे पुढे येत आहेत. याबाबत खातरजमा करण्यात येत आहे. चौकशीत दोषी ठरणार्यांविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात येईल, असेही तपास अधिकार्यांनी सांगितले.

