शिरोली एमआयडीसी : शिये येथील 10 वर्षीय परप्रांतीय मुलीवर तिच्याच नात्यातील मामाने लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला असल्याचे समोर आले असतानाच या प्रकरणाचा तिढा वाढत चालला आहे. दुसरा संशयित राहुल कुमार (वय 19, रा. मूळ बिहार, सध्या शिये, ता. करवीर) हाच मुख्य गुन्हेगार असल्याचे समोर येत आहे. लंंगडणारा तरुण पीडित मुलीस घेऊन जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. तो राहुल कुमार असल्याचे सांगण्यात येते. पण पोलिस याबाबत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत .
दरम्यान, राहुल कुमार याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून त्याला न्यायालयाने 30 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. बुधवारी (दि. 21) दुपारपासून 10 वर्षीय परप्रांतीय मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती सापडली नसल्याने पोलिस हतबल झाले होते. दरम्यान, दुसर्या दिवशी पोलिस पथकातील श्वानाने अवघ्या काही मिनिटांत पीडितेचा माग काढला होता. त्यानंतर पीडितेवर बलात्कार करून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी संशयित आणि पीडितेचा मामा दिनेशकुमार साह याला अटक करून अधिक तपास केला असता त्याने खुनाची कबुली दिली होती. त्यास न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, अधिक तपासात एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये राहुल कुमार हा पीडितेला घेऊन जात असतानाचे चित्रण समोर आले आहे. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढत चालली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात आली असून तपासाची जबाबदारी करवीर विभागीय पोलिस अधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्याकडे आहे. दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी परिसरातील अनेक सीसीटीव्हीचे डीव्हीआर जप्त केले असल्याचे समजते. बुधवारी दिनेश कुमारची पोलिस कोठडी संपणार आहे. पोलिस न्यायालयाकडे कोठडी वाढवून देण्याची मागणी करणार आहेत; तर राहुल कुमारला 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पीडित मुलगी आपल्या लहान भावंडांसोबत खेळत असताना संशयिताने तिला गोड बोलून नेले होते. पीडितेच्या लहान बहिणी ‘लंगडा दीदी को ले के गया था...’ अशी माहिती देत आहेत. त्यामुळे राहुल कुमार याच्यावर संशय बळावला आहे.