आटपाडी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला ५ फेब्रुवारीचा मतदान दिवस मोठ्या धार्मिक कार्यक्रमाशी जुळत असल्याची गंभीर बाब जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
५ फेब्रुवारीला महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री मायाक्का देवीच्या वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस असल्याने मतदारांचा मोठा वर्ग यात्रेसाठी गावाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील मतदानाचा टक्का घसरण्याची भीती आहे.
दरवर्षी सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांतून हजारो बैलगाड्या आणि लाखो भाविक मायाक्का यात्रेत सहभागी होतात. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या यात्रेमुळे मतदारांचा सहभाग कमी होण्याचा धोका असल्याचे आमदार पडळकर यांनी नमूद केले आहे.
याबाबत त्यांनी आयुक्त व सचिवांना अधिकृत निवेदन सादर केले असून, मुंबईत सचिव सुरेश काकाणी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यात्रेचे महत्त्व, भाविकांची संख्या आणि मतदानावर होणारा परिणाम यावर सविस्तर चर्चा केली. तसेच निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी दूरध्वनीद्वारेही संवाद साधण्यात आला.
या विषयाची दखल घेत निवडणूक आयोगाने सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर या चार जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ अहवाल मागविण्याचे संकेत दिले आहेत. अहवालांच्या आधारे लोकशाहीचा सहभाग अबाधित ठेवत धार्मिक भावनांचाही आदर करणारा निर्णय अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
मतदारांच्या न्याय हक्क देण्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आमदार पडळकर यांनी केलेला हा पुढाकार कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करणारा ठरला असून, निवडणूक आयोगाकडून ‘सकारात्मक निर्णय’ येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.