

Election Date Postponement Sangli
विटा : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या मतदानाची तारीख ५ फेब्रुवारी जाहीर केली आहे. मात्र याच दिवशी श्री क्षेत्र चिंचली मायाक्का देवी यात्रेचा मुख्य दिवस येत असल्याने मतदानाची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग व चिटणीस प्रमोद धायगुडे यांनी केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद मंगळवारी दुपारी चार वाजता पार पडली. या परिषदेत गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या १२ जिल्हा परिषदांचा समावेश आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग; पुणे विभागातील पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या जिल्ह्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान, कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र चिंचली मायाक्का देवीची वार्षिक यात्रा यंदा १ ते ९ फेब्रुवारीदरम्यान भरत आहे. यात्रेचा मुख्य दिवस गुरुवारी, ५ फेब्रुवारी रोजी असून, याच दिवशी देवीचा महानैवेद्य (बोनी) व पालखी सोहळा होतो. या दिवशी लाखो भाविक देवीला नैवेद्य अर्पण करतात. हा दिवस यात्रेतील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक विधी मानला जातो.
मात्र हाच दिवस मतदानासाठी निश्चित झाल्याने सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर तसेच कोकण व मराठवाड्यातील ज्या भाविकांचे कुलदैवत, ग्रामदैवत किंवा आराध्य दैवत श्री मायाक्का आहे, त्या लाखो मतदारांची मोठी अडचण होणार आहे.
याबाबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग व प्रमोद धायगुडे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, दरवर्षी आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, मिरज, माण, खटाव, फलटण, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर आदी तालुक्यांमधून सुमारे दोन ते तीन लाख भाविक चिंचली यात्रेसाठी जातात. यंदाही मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळे ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाल्यास मतदानाच्या टक्केवारीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेऊन मतदानाची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी काळेबाग व धायगुडे यांनी केली आहे.