

Khanapur Constituency Dongri Vikas Yojana
विटा : तत्कालीन लोकप्रतिनिधींनी आकस बुद्धी ठेवून खानापूर मतदारसंघातील काही गावे डोंगरी विकास योजनेमधून वगळली, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर घाटमाथा येथे एका कार्यक्रमाला ते आले असता बोलत होते.
यावेळी आमदार पडळकर म्हणाले की, सुनील पाटील हे माझे जिवाभावाचे मित्र आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व निष्कलंक आहे, या गावासाठी आणि भागासाठी त्यांचे कार्य मोठे आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुनील पाटील यांच्या मित्र परिवाराने घाटमाथ्यावरच्या काही गावांचा समावेश डोंगरी भागामध्ये करा, अशी मागणी केली आहे.
घाट माथ्यावरची काही गावे डोंगरी विकास योजने पासून वंचित राहिली आहेत. मात्र, आपण याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी २०१६ - १७ मध्ये अर्थ व नियोजन खात्याचे मंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतीत एक समिती स्थापन केली होती. परंतु येथील तत्कालीन लोकप्रतिनिधींनी आकस बुद्धी ठेवून काही गाव डोंगरी विकास योजनेमधून वगळली होती.
यात पोसेवाडी, मोही, शेडगेवाडी, रामनगर, करंजे, सुलतानगादे, भडकेवाडी, गोरेवाडी ही गावे आहेत. आज मी या निमित्ताने शब्द देतो की , जोपर्यंत याबाबतीत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मी विधानभवनाच्या पायरीवर ठाण मांडून बसणार आहे. यावेळी जत तालुक्यातीलही काही गावे डोंगरी योजनेपासून वंचित आहेत. त्यासाठीही आपण शासनाकडे आग्रही मागणी करणार आहोत, असेही आमदार पडळकर यांनी सांगितले.
यावेळी सुनील पाटील यांच्यासह राजेंद्र माने, सुहास पाटील,ॲड. तानाजी जाधव, यशवंत मेटकरी, सत्यजित पाटील, विवेक गायकवाड यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक गावातील पदाधिकारी उपस्थित होते.