शिराळा : ‘पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव या उच्चविद्याविभूषित आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्या पाठीशी समृद्ध वैचारिक वारसा आहे. पदवीधरांच्या अडीअडचणींची त्यांना सखोल जाण असल्याने त्या या प्रश्नांना निश्चितच न्याय देतील,’ असा ठाम विश्वास माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केला.
चिखली (ता. शिराळा) येथील नामांकित विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना आणि 'विश्वास उद्योग समूहा'तील विविध संस्थांना डॉ. स्मिताताई जाधव यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी आयोजित मेळाव्यात पदवीधर मतदार आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना नाईक बोलत होते.
या प्रसंगी बोलताना मानसिंगराव नाईक पुढे म्हणाले, ‘शिराळा हे डॉ. स्मिताताईंचे माहेर असून पुणे आणि कोल्हापूर ही त्यांची मुख्य कर्मभूमी राहिली आहे. दिवंगत माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या वैचारिक वारशाचे भक्कम पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. पदवीधरांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी त्या सक्षम नेतृत्व आहेत.’
आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. स्मिताताई जाधव म्हणाल्या, "पुणे पदवीधर मतदारसंघातील सुशिक्षित युवक-युवतींना शिक्षणानंतर योग्य दिशा मिळवून देणे आणि हक्काचा रोजगार उपलब्ध करणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. पदवीधरांचे प्रश्न विधिमंडळात मांडून ते तडीस नेण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. कौशल्य विकासाला चालना देणे, नवीन उद्योगांना पूरक केंद्रे उभारणे, तसेच स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन केंद्रांचे जाळे विणण्याला माझे प्राधान्य राहील. या प्रवासात माहेरच्या मंडळींनी मला आशीर्वाद व भक्कम पाठबळ द्यावे."
या वेळी जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक, सौ. सुनितादेवी नाईक यांच्यासह विश्वास उद्योग समूहातील संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.