

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सूनबाई डॉ. स्मिता जाधव यांना विधानपरिषदेत पाठवणार असा निर्धार जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी केला. विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. जाधव यांनी कोल्हापुरातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या.
यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांनी डॉ. जाधव यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. उच्चशिक्षित महिला उमेदवार म्हणून कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करणे ही कोल्हापूरकरांची जबाबदारी राहील, असे आवाहनही त्यांनी केले. या भेटीदरम्यान त्यांनी माजी खासदार निवेदिता माने, वेदांतिका धैर्यशील माने, ‘गोकुळ’चे माजी चेअरमन विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, जि.प. चे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जि. प. चे उपाध्यक्ष तानाजी पाटील, आमदार अमल महाडिक, दुर्गेश लिंग्रज आदी नेत्यांची भेट घेऊन निवडणुकीबाबत चर्चा केली.
यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले, महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव या कोल्हापूरचा अभिमान आहेत. त्या उच्चशिक्षित असून, अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना प्रथम पसंती क्रमांकाचे मत देऊन विजयी करणे ही प्रत्येक कोल्हापूरकरांची जबाबदारी आहे.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, यावेळी सक्षम उमेदवार मिळाल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना अधिक बळ मिळाले असून, प्रत्येक कार्यकर्ता जोमाने कामाला लागला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्या प्रचंड बहुमताने निवडून येतील. महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या, डॉ. स्मिता जाधव यांच्या रूपाने महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळत आहे. कोल्हापूरची संपूर्ण महिला शक्ती त्यांच्या विजयासाठी कटिबद्ध आहे.
डॉ. स्मिता जाधव यांना निवडून आणणे ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. त्यांना विधानमंडळात पाठवणे हे कोल्हापूरकरांचे कर्तव्य आहे. जबाबदारी वाटून घेऊ आणि हा विजय खेचून आणू. -
हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री
डॉ. स्मिता जाधव यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देणे ही आमची जबाबदारीच नाही, तर कर्तव्य आहे.
राजेश क्षीरसागर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार