दिघंची जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज पाटील यांनी सादर केलेले कुणबी प्रमाणपत्र बोगस असल्‍याचा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.  Pudhari Photo.
सांगली

Gopichand Padalkar | जात पडताळणी समित्या पैसे खाऊन चुकीची कामे करताहेत : आमदार पडळकरांचा महायुती सरकारला घरचा आहेर

पृथ्वीराज पाटील यांच्यासह सांगलीच्या जात पडताळणी समितीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Gopichand Padalkar on Kunbi certificate

विटा, पुढारी वृत्तसेवा : "राज्‍यात जात पडताळणी समित्या स्थापन झालेल्या आहेत. सर्व जात पडताळणी समित्या या पैसे खाऊन चुकीची कामे करताहेत, असा घरचा आहेर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महायुती सरकारला दिला आहे. मुंबईत भाजपच्या कार्यालयामध्ये आज (दि. ३१) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कुणबी दाखल्यांच्या प्रमाणपत्र देण्यात मोठी अफरातफर

यावेळी पडळकर म्हणाले की, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राज्य सरकारच्या जात पडताळणी समित्यांचा बोगसपणा उघडकीस आला आहे. विशेषतः कुणबी दाखल्यांच्या प्रमाणपत्र देण्यात प्रचंड मोठी अफरातफर झालेली आहे, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

जात पडताळणी समितीकडे सादर करण्यात आली खोटी कागदपत्रे

आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज तानाजी पाटील उमेदवार होते. त्यांनी कुणबी दाखल्यावर निवडणूक लढवली आणि जिंकलीही. त्यांनी जातीचा पुरावा म्हणून वडील तानाजी भगवान पाटील, आजोबा भगवान बाळू पाटील आणि पणजोबा बाळू पाटील यांचा मृत्यूचा दाखला पुरावा म्हणून जोडलेला आहे. त्यामुळे ते कुणबी असल्याचा उल्लेख आहे. बाळू पाटील यांचा मृत्यू १८७७ रोजी वयाच्या २५ व्या वर्षी तापामुळे झाल्याचे नमूद केले आहे. तर आजोबा भगवान पाटील यांचा मृत्यू १ मे २००९ ला झाला आहे. आजोबा भगवान पाटील हे १३५ वर्ष जगले. त्यानंतर तानाजी पाटील यांचा जन्म १२ मे १९७३ रोजीचा आहे. याचाच अर्थ भगवान पाटील यांना वयाच्या ९८ व्या वर्षी मुलगा झाला. मुळात भगवान पाटील हे ७५ ते ८० वय असताना वारले होते. जात पडताळणी समितीने कोणती कागदपत्रे तपासली की ज्या आधारे पृथ्वीराज पाटील यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिलं, असा सवाल करत माझा आक्षेप जात पडताळणी समितीवर आहे, असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या जात पडताळणी समितीने आमच्या उमेदवारांना निरोप दिला होता. आम्हाला तीस लाख रुपये द्या, आम्ही पाटील यांचा कुणबी दाखला रद्द करू, असा आरोपही केला आहे.

पृथ्वीराज तानाजी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा

खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी तात्काळ पृथ्वीराज तानाजी पाटील यांच्यावर राज्य सरकारची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत गुन्हा दाखल केला नाही तर येत्या एक-दोन दिवसांत हजारो कार्यकर्ते पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करतील. सांगलीच्या जात पडताळणी समितीवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, या समितीतल्या सर्वांची सखोल चौकशी केली पाहिजे आणि पृथ्वीराज पाटील यांना दिलेले कुणबी दाखल्याचे प्रमाणपत्र रद्द झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

पृथ्वीराज पाटील यांचे जिल्हा परिषद सदस्य पद रद्द करावे

धनगर दाखल्या संदर्भात संभाजीनगरमध्ये जात पडताळणी समितीने व्हॅलिडीटी प्रमाणपत्रेही दिली होती. मात्र सरकारने आदेश केल्यानंतर ते सर्व दाखले रद्द केले होते. त्याच धर्तीवर आता हा दाखला सुद्धा रद्द करावा आणि सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून पृथ्वीराज पाटील यांचे जिल्हा परिषद सदस्य पद रद्द करण्यात यावे, अशी मागणीही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT