विटा : कोणाच्या दबावाने चुकीचे काम कराल तर चाबकाचे फटके मिळतील, असा सज्जड दम भाजप नेते, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी गुरूवारी (दि.२२) विटा पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला. तसेच मनमानी कारभार करणाऱ्याला सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
विटा पालिकेमध्ये माजी समाज कल्याण अधिकारी ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यांच्या सोबत सुरेश जगन्नाथ चोथे, तुषार जगन्नाथ चोथे, स्वप्नील धोंडीराम चोथे, संदीप धोंडीराम चोथे, धनंजय रामचंद्र चोथे, अभिषेक संजय चोथे, युवा नेते पंकज दबडे, संदीप ठोंबरे, सुहास कुलकर्णी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विटा पालिकेमध्ये गेले तीन वर्षापासून प्रशासक राज आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना कोणीही, कशाही पद्धतीने सूचना किंवा आदेश देऊन त्यांना हवी, तशी कामे करून घेत आहेत. त्यामुळे सामान्य लोकांची मात्र नाहक गैरसोय होत आहे. येथील म. गांधी विद्यामंदिराजवळील लाईटचे दोन खांब मुख्याधिकाऱ्यांचा आदेश नसताना आज (गुरूवारी) सकाळी काढले. हे खांब वीज अभियंता सोमनाथ माळी आणि आरोग्य निरीक्षक नारायण शितोळे यांनी काढल्याचा आरोप करत सुरेश चोथे आणि त्यांच्या भावकीतील लोक तसेच सुनील मेटकरी आदींनी माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासोबत पालिकेतल्या सभागृहात वीज अभियंता माळी यांना जाब विचारला. यावेळी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील पालिकेत नव्हते. त्यावेळी संतप्त पडळकर म्हणाले, तुम्ही जनतेचे सेवक आहात. त्यामुळे जनतेची कामे करा. कोणाच्या तरी सांगण्यावरून खांब लावणे आणि काढणे असले काम करू नका अन्यथा गाठ माझ्याशी आहे. नाहीतर तुमची खातेनिहाय चौकशी लावावी लागेल. कुणाच्या तरी सांगण्यावरून मनमानी कारभार करून दबावापोटी चुकीचे काम कराल तर चाबकाचे फटके मिळतील, असा सज्जड दमही माजी सभापती पडळकर यांनी यावेळी दिला. अचानक विटा पालिकेत घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती.