

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागातील घरनिकीसह आसपासच्या पिंपरी खुर्द आणि गावांना सोमवारी (दि.१९) दुपारी चक्रीवादळाने तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घरनिकी परिसरातील नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. तसेच आंबा बागांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.
घरनिकी परिसरात सोमवारी दुपारी ४ च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे परिसरातील काही घरांचे पत्रे उडून गेले. तर काही घरांवरील कौलांचे नुकसान झाले. यासह संसारोपयोगी वस्तूंचेही मोठे नुकसान झाले. घरनिकी येथील महादेव बुधा तोरणे यांच्या घरावर झाड पडल्याने घराची मोठी हानी झाली. तसेच भीमराव कदम यांच्या चारचाकी वाहनावर झाड कोसळल्याने त्यांच्याही वाहनाचे मोठे नुकसान झाले. परिसरात झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर विजेचा खांब कोसळल्याने गावातील काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या तडाख्यामुळे घरनिकी परिसरातील आंबा बागांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीमुळे अनेक झाडांवरील आंबे गळून पडले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी नुकतेच फळांचे पीक बाजारात पाठवण्याची तयारी केली होती. त्यांना मोठा फटका बसला. दरम्यान शेती आणि घरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी घरनिकी येथील ग्रामस्थांनी मागणी केली आहे.