

विटा : गेल्या ऑक्टोबरमध्ये सुधारित वाझर बंधारा पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. ८८ कोटींची ही योजना निधी अभावी रखडल्याच्या चर्चेला ऊत आल्याने विटेकर अस्वस्थ झाले आहेत.
विटा शहराच्या सध्याच्या घोगाव नळ पाणी पुरवठा योजनेचे पाणी वाढती लोकसंख्या आणि कमी उपलब्धता यामुळे अपुरे पडत आहे. शिवाय विटेकरांना जी पाणीपट्टी (वर्षाकाठी साडेतीन हजार रुपये इतकी) भरावी लागत आहे. त्यात कपात करू, असे सांगून नवीन पाणी योजना विटेकरांसाठी करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन आमदार अनिल बाबर आणि त्यानंतर आमदार सुहास बाबर आणि त्यांचे बंधू अमोल बाबर यांनी विटा शहराच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेला राज्य सरकारकडून मंजूरी मिळवून आणली. एकूण ८८ कोटी ११ लाख ३१ हजार १८६ रुपयांची ही योजना आहे.
या योजनेसाठी कृष्णा नदी तसेच येरळा नदीवरील वाझर बंधारा असे दोन स्त्रोत असणार आहेत. योजनेच्या पहिल्या टप्प्यात ४. ६९ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. यातून विटा शहराची दैनंदिन १२.८६ दशलक्ष घन मीटर पाण्याची गरज भागविता येणार आहे. तसेच शहराची २०५५ पर्यंतची १ लाख ४ हजार ३३५ इतकी लोकसंख्या गृहीत धरून या योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत विटा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घोगाव योजनेतील दुरुस्ती पाईपलाईन बदलणे तसेच वाझर बंधाऱ्यातून नवीन स्त्रोत सुरू करणे, नवीन पाण्याची टाकी अंतर्गत पाईप लाईन, अशी कामे होणार आहेत. तसेच खुद्द विटा शहरात हणमंतनगर, मायणी रस्ता, शिवाजीनगर- कराड रस्ता, नवीन भाळवणी रस्ता, फुलेनगर आणि पारे रस्ता या ठिकाणी साडेपाच लाख लिटर पाणी साठवण क्षमतेच्या सहा नवीन टाक्या उभारण्यात येणार आहेत. या नवीन सुधारित योजनेतून विटेकरांना २४ तास ७ दिवस दररोज पाणी मिळणार आहे. याशिवाय वीज बिल कमी येणार असल्याने वार्षिक पाणीपट्टी सुद्धा कमी होणार आहे.
सध्या विटेकरांना घोगाव (ता.पलूस) मधून कृष्णा नदीतून पाणी मिळत आहे. विटा शहरापासून तब्बल ३५ किलोमीटर अंतरावरून पाणी कृष्णा नदीतून जॅकवेलद्वारे उचलून आणल्यामुळे विजेचा खर्च दर महिन्याला ५० लाख रुपयेहून जास्त आहे. हा खर्च विटा पालिका पाणीपट्टीच्या करातून पैसे गोळा करून भरत आहे. साहजिकच त्यामुळे विटा पालिका दर वर्षाला प्रत्येक नळ पाणीपुरवठा कनेक्शन मागे साडेतीन हजार रुपये कर अर्थात पाणी पट्टी आकारणी करत आहे. वाझर बंधाऱ्यातून पाणी आल्यानंतर साडे पाच लाख लिटर्सच्या एकूण उंचावरील सहा ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. विट्यातून वाझर बंधारा हे अंतर केवळ १५ किलोमीटर इतकेच आहे, त्यामुळे पाणी उचलण्यासाठी आणि वाहून आणण्यासाठी विजेची बचत होणार आहे.
परिणामी विटेकरांच्या पाणीपट्टीमध्येही कपात होणार आहे. मात्र ऑक्टोबर २०२४ मध्ये दीड वर्षाची मुदत असलेल्या या सुधारीत योजनेचे अद्याप ३० टक्के सुद्धा काम झालेले नाही. या योजनेत वाझर बंधारा जॅकवेल ते आळसंद शुद्धीकरण केंद्रापर्यंत बंदिस्त जल वाहिनी टाकण्यात येणार आहे. मात्र हे काम आताच करून घेतले पाहिजे. कारण जलवाहिनी जिथून जाणार आहे, तो संपूर्ण भाग ऊस पट्ट्याचा भाग आहे. शेतकऱ्यांचा ऊस अपवाद वगळता कारखान्याकडे गेला आहे. सध्या राने रिकामी आहेत, तोपर्यंतच जलवा हिन्या टाकणे सोपे जाईल. एकदा का लोकांनी ऊस लावला तर पुन्हा त्यातून जलवाहिन्या नेणे कठीण होणार आहे. मात्र त्या दृष्टीने काहीही हालचाल दिसत नाही. सांगली एका काँट्रॅक्टर्स कंपनीकडे या योजनेचा ठेका आहे, त्या कंपनीचे लोक जाणूनबाजून वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप लोक करीत आहेत. मात्र सरकारकडून निधी वेळेत उपलब्ध होत नाही, असे यामागे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे विटेकर अस्वस्थ झाले आहेत.