शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न Pudhari Photo
सांगली

शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेचे नेते दिनकर पाटील यांच्या पुतण्यावर कवठेमहांकाळ येथे शुक्रवारी रात्री अज्ञात तरुणांकडून गोळीबाराचा प्रयत्न झाला. अचानक रिव्हॉल्व्हरचे पिस्टल लॉक झाल्याने ते थोडक्यात बचावले. ही घटना शहरातील एका मोबाईल शॉपीसमोर घडली. अभिजित युवराज पाटील असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत याची नोंद पोलिसांत झालेली नव्हती.

युवराज अण्णा पाटील यांचे थोरले चिरंजीव व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिनकर तात्या पाटील यांचे पुतणे अभिजित युवराज पाटील हे शुक्रवारी सायंकाळी आपल्या कामानिमित्त कवठेमहांकाळ शहरात तहसील कार्यालयासमोरील एका मोबाईल दुकानात आलेले होते. ते सहकारी मित्रांसमवेत मोबाईल दुकानात बसलेले असताना, निळा शर्ट, तोंडाला रुमाल बांधलेल्या एका युवकाने दुकानामध्ये प्रवेश केला. त्याने कमरेला लावलेले रिव्हॉल्व्हर बाहेर काढले. अभिजित पाटील यांच्या दिशेने रिव्हॉल्व्हर रोखले आणि गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पण अचानक पिस्टल लॉक झाल्याने अभिजित युवराज पाटील हे थोडक्यात वाचले.

या घटनेनंतर अभिजित पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी अज्ञात हल्लेखोराचा पाठलाग केला. त्या हल्लेखोराने डॉ. खोत यांच्या रुग्णालयासमोर आपली मोटरसायकल लावली होती. हल्लेखोर मोटरसायकलवरून नगरपंचायतीच्या दिशेने पळून गेला. या घटनेची नोंद अद्याप पोलिस ठाण्यात झाली नाही, पण या गोळीबाराच्या घटनेमुळे कवठेमहांकाळ तालुक्यात खळबळ माजली आहे.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे, कवठेमहांकाळचे निरीक्षक जोतिराम पाटील यांनी तपास सुरू केला आहे.

सीसीटीव्हीत घटना कैद

शहरातील मोबाईल दुकानात गोळीबाराचा प्रयत्न झाला. तेथील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. पोलिसांनी फुटेजची तपासणी सुरू केली आहे.

रिव्हॉल्व्हर की एअरगन?

अभिजित पाटील यांच्यावर हल्ला करण्यासाठी तरुण मोबाईल दुकानात आला. त्याने कमरेला लावलेले रिव्हॉल्व्हर काढले. गोळीबाराचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटनाक्रम दिसतो. पण हल्लेखोराकडे रिव्हॉल्व्हर होते की एअरगन, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT