भंडारा : गणेशपूर येथील रमाबाई आंबेडकर वॉर्डात सोमवारी (दि.६) सायंकाळी गोळीबार झाला. या गोळीबारातील तिघांना आज (दि.६) पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यांना ११ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींमध्ये सावन उर्फ भोलू कटकवार, चेतन तिघरे आणि नचिकेत समरीत यांचा समावेश आहे. या घटनेचे कारण एक वर्षापूर्वी झालेले खून प्रकरण असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील रमाबाई आंबेडकर वॉर्डामधील अंकुश शहारे याच्या घरासमोर सोमवारी सायंकाळी गोळीबार करून आरोपी दुचाकीवरून पसार झाले होते. या घटनेनंतर शहरात दहशत निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. आरोपींनी झाडलेली गोळी भिंतीला लागल्याने जीवितहानी झाली नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला.
जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत निर्देश दिले. घटनास्थळी मिळालेले रिकामे काडतूस ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. ते देशी कट्ट्यातून झाडल्याचा अंदाज पोलिस अधिकारी व्यक्त करत आहेत.
ठाणेदार सुभाष बारसे व त्यांच्या चमूने या प्रकरणात टप्पा मोहल्ला येथील सावन उर्फ भोलू कटकवार, चेतन तिघरे आणि नचिकेत समरित यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून देशी कट्टा, पाच जिवंत काडतूस आणि एक शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे. या आरोपींना आज (मंगळवारी) न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना ११ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
गणेशपूर येथे २२ आॅगस्ट २०२३ ला रात्री अभिषेक कटकवार या तरूणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी चिराग गजभिये हा होता. त्याची एक जूनला कारागृहातून पॅरोलवर त्याची सुटका झाली. तेव्हापासून मृत अभिषेकचा पिता असलेला सावन कटकवार व इतर त्याच्या मागावर होते. त्याच प्रयत्नात सोमवारी सायंकाळी तिघे दुचाकीवरून रमाबाई आंबेडकर वॉर्डात फिरत होते. त्यांनी चिराग गजभिये याच्या घरालगत असलेल्या अंकुश तिघरे याच्या घरावर गोळीबार केला. मात्र, घाईगडबडीत घरावर गोळीबार केला.