Amol Babar Vita Municipal Council
विटा : विटा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक व नूतन नगरसेवक अमोल बाबर यांची नाट्यमय घडामोडीनंतर बिनविरोध निवड झाली. तसेच उज्ज्वला पाटील, अविनाश शितोळे आणि प्रणव हारगुडे यांची स्वीकृत (को-ऑप्टेड) नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार शुक्रवारी विटा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी काम पाहिले. यावेळी नगराध्यक्षा काजल म्हेत्रे उपस्थित होत्या.
उपनगराध्यक्षपदाच्या निवडीबाबत निकालानंतर अवघ्या काही दिवसांतच जोरदार चर्चा सुरू झाली होती. पक्षांतर्गत तसेच बाहेरून विविध नावे चर्चेत होती. दरम्यान, बाबर गटातील काही नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपापल्या गटाला संधी मिळावी यासाठी हालचाली सुरू केल्या. ही बाब लक्षात येताच मूळ बाबर गट अधिक सक्रिय झाला. आमदार सुहास बाबर यांचे बंधू, विटा पालिकेच्या विजयाचे ‘किंगमेकर’ म्हणून ओळखले जाणारे युवा नेते व नूतन नगरसेवक अमोल बाबर यांनीच हे पद स्वीकारावे, असा आग्रह गटाकडून धरला गेला.
मात्र, प्रचारादरम्यान आपण कोणतेही पद स्वीकारणार नसल्याची भूमिका अमोल बाबर यांनी जाहीरपणे मांडली होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळी साडेअकरापर्यंतही निर्णय होऊ शकला नाही. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बाबर गटाचे निष्ठावंत नगरसेवक विनोद गुळवणी, वैभव म्हेत्रे, अमर शितोळे, रणजीत पाटील, नंदू पाटील, संजय भिंगारदेवे, भालचंद्र कांबळे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी पालिका इमारतीसमोर पत्रकार परिषद घेत अमोल बाबर यांनीच उपनगराध्यक्षपद स्वीकारावे, अन्यथा कुणीही अर्ज भरणार नसल्याची ठाम भूमिका मांडली.
या भूमिकेमुळे अमोल बाबर यांच्यावर पक्षाचा दबाव वाढला. अखेर त्यांनी पद स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर अर्ज सादर करण्यात आला आणि दुपारी दोन वाजता त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
निवडीनंतर आमदार सुहास बाबर यांनी पालिकेत येऊन नूतन उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांचा सत्कार केला. यावेळी अमोल बाबर म्हणाले, “माझी ही निवड अनपेक्षित आहे. पद स्वीकारण्याची माझी इच्छा नव्हती; मात्र पक्षातील ज्येष्ठ नेते आणि नगरसेवकांचा निर्णय मान्य केला. लोकभावनेचा आदर ठेवून पालिकेचा विकास पुढे नेण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करू. निवडणुकीदरम्यान दिलेल्या शब्दांप्रमाणे विकासाच्या नव्या दिशेने विटा शहराला घेऊन जाण्याचा प्रयत्न राहील.”