

विजय लाळे, विटा
ही वर्षांपासूनच्या पालिकेच्या बेबंदशाहीच्या कारभाराविरोधात ‘जेन झी’ ला पद्धतशीरपणे हवा देत आमदार सुहास बाबर आणि युवा नेते अमोल बाबर यांनी विट्यात पाटलांची अमर्याद सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला प्रचंड यश मिळाले, तर भाजपरूपी पाटलांची सद्दी संपली. पालिकेची शेवटची निवडणूक 2016 मध्ये झाली होती. त्यावेळी शिवसेनेचे बाबर गटाचे केवळ दोन सदस्य होते. उरलेले 22 उमेदवार आणि नगराध्यक्ष पाटील गटाकडे होते. त्यावेळी अमोल बाबर यांच्या पत्नी शीतल बाबर यांचा नगराध्यक्ष पदासाठी 4 हजार मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी युवा नेते वैभव पाटील यांच्या पत्नी प्रतिभा पाटील निवडून आल्या होत्या.
2019 च्या निवडणुकीतही विट्यात आमदार अनिल बाबर यांना कमी मते मिळाली होती. मात्र त्यानंतर खानापूर तालुक्याबरोबरच विटा शहरातही बाबर गटाने बांधणी करून विकासाची कामे आणली. त्यातच टेंभू योजनेचे पाणी विटा परिसरात आणून शब्दशः अर्थाने लोकांना आर्थिकदृष्ट्या उभे केले. तसेच एकीकडे रस्ते, गटारी पिण्याचे पाणी यासारख्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी बाबर गटाने प्रामाणिक प्रयत्न केले. 2021 च्या डिसेंबर महिन्यात पालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांचा काळ संपला आणि प्रशासकराज सुरू झाले.
मधल्या पाच वर्षांच्या काळात विटा पालिकेला दोनवेळा स्वच्छतेबद्दल राज्य आणि देशपातळीवर पुरस्कार मिळाला. ही पाटील गटाची जमेची बाजू असली तरी, गेल्यावर्षी प्रशासकराजच्या काळात सुद्धा विटा पालिकेने स्वच्छतेमध्ये देशात नामांकन मिळवले होते. त्यामुळे लोकांना स्वच्छतेबद्दल पाटील यांनी विशेष काही केले, याचे अप्रूप राहिले नाही. त्यातच पत्नीचे आणि त्यानंतर लागोपाठ आमदार अनिल बाबर यांचेही निधन झाले. त्यामुळे जनतेमध्ये सहानुभूतीची लाट पसरली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आमदार बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर आणि अमोल बाबर यांनी विटा शहरासाठी रस्ते, गटारी आणि इतर विकास कामांसाठी तब्बल एक हजार कोटींहून अधिक रुपयांचा निधी आणला.
प्रत्यक्षात कामे सुरू झाली. तसेच त्या कामांचा विशेषतः बाबर गटाने केलेल्या रस्त्यांचा दर्जा आणि पाटील गटाने केलेले रस्ते आणि इतर विकास कामांच्या दर्जाबाबत आपोआपच लोकांमध्ये तुलना होऊ लागली. याचदरम्यान विधानसभेची निवडणूक लागली आणि सुहास बाबर यांना विटेकरांनी तब्बल 4 हजार 200 चे मताधिक्य देऊन, पुढचाही कौल स्पष्ट केला होता. विटा पालिकेतील कथित भ्रष्टाचार तसेच दादागिरी, दडपशाही, एकाधिकारशाही, अंदाधुंदी, अनागोंदी, बेकायदेशीरपणा अशा एकूणच बेबंदशाहीच्या कारभाराला वैतागलेल्या विटेकरांनी विशेषतः जनरेशन झी म्हणजे 18 ते 30 वयोगटातील तरुण पिढीने ही निवडणूक हाती घेतली होती आणि तीच निर्णयक ठरली.
जनतेला गृहित धरण्याची मोठी चूक
आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांनी प्रत्येक प्रभागाचे, बूथचे आणि प्रत्येक उमेदवारनिहाय जे नियोजन केले होते, ते अत्यंत अचूक ठरले. विशेषतः पाटील गट सोडून अनेक कारणांनी नाराजीमधून बाबर गटाकडे आलेल्या तब्बल दहाजणांना थेट उमेदवारीच्या रिंगणात उतरवून मोठी खेळी केली होती, यात त्यांना प्रचंड यश आले. एकीकडे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे जुने पारंपरिक निवडणूक तंत्र आणि आमदार बाबर यांचे युवा पिढीला हाताशी धरून केलेले व्यवस्थापन याची पूर्ण सरशी झाली. तसेच या निवडणुकीत माजी आमदार पाटील गटाचे नियोजनशून्य, अपवाद वगळता वजाबाकीचे राजकारण आणि जनतेला गृहित धरण्याचे राजकारण सपशेल फसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच भाजपच्या मूळ नेत्यांना, कार्यकर्त्यांना दुखावणे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटालाही कमी लेखणे, हे देखील पाटील गटाच्या राजकारणाच्या मुळावर आले.