आटपाडी : आटपाडीचे ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवांच्या कार्तिकी यात्रेत यंदा उत्साह, जल्लोष आणि ढोल-ताशांच्या गजरात कोटींचा व्यवहार रंगला. परंपरागत शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारासाठी ख्यातनाम असलेल्या या यात्रेत यंदा तब्बल चार कोटी रुपयांची उलाढाल झाली. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, कोल्हापूर, पुणे येथील व्यापाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
यात्रेतील आकर्षण ठरला तो सोमनाथ शंकर जाधव-माळी यांच्या माडग्याळ जातीच्या देखण्या बकऱ्याचा ‘हिंदकेसरी’ किताब! पाच वर्षावरील गटात चमकदार अंगकाठी, झगमगणारे शरीररंग आणि ठसठशीत रचना यामुळे या बकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याला बक्षीस म्हणून बुलेट मोटारसायकल जाहीर होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत दणदणीत स्वागत केले.
जेसिबीतून काढली मिरवणूक
बकऱ्याला फुलांनी सजवून आणि झुली पांघरून थेट जेसीबीवरून मिरवणूक—ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, आणि जल्लोषात बकरा मालक सोमनाथ जाधव व सभापती संतोष पुजारी यांना शेतकऱ्यांनी खांद्यावर घेत जल्लोष केला. यात्रेत काही क्षणांसाठी राजा कसला दिसतो याचा प्रत्ययच आला!
अंदाजे १२ हजारांवर शेळ्या-मेंढ्यांची आवक झाली. लहान बकऱ्यांचे दर २५ ते ५० हजार तर पैदाशीसाठी उपयुक्त जातींच्या मेंढ्यांना २ ते ५ लाखांपर्यंतची मागणी होती. काही जातिवंत आणि सुदृढ मेंढ्यांची तर किंमत २० लाखांपासून थेट कोटीपर्यंत सांगण्यात आली. पण प्रत्यक्ष व्यवहार झाला नाही असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, उपसभापती सुनील सरक, सचिव शशिकांत जाधव, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था आणि विजेची सुविधा उत्तम प्रकारे दिल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
जातिवंत मेंढ्या ‘सोने-मोत्यां’सारख्या मौल्यवान
आटपाडीत यंदा उच्च पैदाशीस उपयुक्त मेंढ्यांना ५ लाखांचा ‘सर्वोच्च दर’ तर काही जातींना १ कोटीपर्यंतचा भाव सांगण्यात आला, यातून पशुपालकांच्या दर्जेदार पालनपद्धतीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.