

इस्लामपूर : राज्य शासनाने इस्लामपूर शहराचे नाव बदलून ‘उरूण ईश्वरपूर’ केले आहे की, फक्त नगरपरिषदेचे नाव बदलले आहे, याचा खुलासा याचे श्रेय घेणार्या सत्ताधार्यांनी करावा. निवडणुकीच्या तोंडावर उरूणवासीयांची फसवणूक केल्यास सरकारविरोधत पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकार्यांनी पत्रकार बैठकीत दिला.
शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, शहराच्या नामांतराबाबत सत्तेत असणार्यांनी उरूणवासियांची फसवणूक केली आहे. नामांतरणात ‘उरूण’ नावाचा उल्लेख हवा, यासाठी नागरिकांनी उपोषण केले होते. लवकरच उरूण नावाचा उल्लेख केला जाईल, असे आश्वासन त्यावेळी आम्हाला देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात शासकीय अध्यादेश काढताना फक्त ‘उरूण ईश्वरपूर’ नगरपरिषदेचे नाव बदलण्यात येत आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शहराचे नाव बदलले की नगरपालिकेचे? याचा खुलासा सत्ताधार्यांनी करावा. नामांतरात ‘उरूण’ नावाचा समावेश हवा, यासाठी आम्ही जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटलो होतो. राज्यपालांनी राज्य सरकारला आदेश दिल्यामुळेच हा अध्यादेश काढण्यात आला आहे.
माजी नगरसेवक खंडेराव जाधव म्हणाले, पालिकेतील सत्ताधार्यांनी शासनाला नामांतरणाचा ठरावच चुकीचा दिला आहे. त्याचवेळी ‘उरूण ईश्वरपूर’ असे नाव करावे, असा ठराव दिला असता, तर आज हा सर्व घोळ झाला नसता. नगरपरिषदेचे नाव बदलले म्हणजे शहराचे नाव बदलले, असे होत नाही. त्यांनी विनाकारण लोकांची दिशाभूल करू नये. नगरपालिकेने पुन्हा ‘उरूण ईश्वरपूर’ नावाचा ठराव पाठवावा. सुहास पाटील, शैलेश पाटील, सुहास पाटील, दादासाहेब पाटील, संदीप माने उपस्थित होते.
शहाजी पाटील म्हणाले, नामांतरणावरून आमचे नेते आमदार जयंत पाटील यांना विनाकारण खलनायक बनवण्यात येत आहे. मुळात आमचा नामांतरणाला विरोधच नाही. फक्त ‘ईश्वरपूर’ आधी ‘उरूण’ नावाचा उल्लेख व्हावा, हीच आमची मागणी आहे. नामांतरण करताना आमदार जयंत पाटील यांना विश्वासात घेतले असते, तर त्यांनी झालेली चूक निदर्शनास आणून दिली असती.