

आटपाडी ः सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या राजेवाडी तलावाचे नियंत्रण सांगली जिल्ह्याकडे हस्तांतरित करण्याच्या मागणीला जलसंपदा विभागाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. आमदार सुहास बाबर यांनी मंगळवारी मुंबईत मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन ही मागणी केली. या मागणीवर मंत्र्यांनी तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिल्याने आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बाबर म्हणाले, दुष्काळी भागातील तालुक्यात स्थानिक उपयुक्ततेसाठी हस्तांतरण गरजेचे होते. राजेवाडी तलाव हा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या हद्दीत आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या तलावाचे पाणी प्रामुख्याने आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील शेतीसाठी उपयुक्त आहे. सध्या तलावाचे व्यवस्थापन सांगली जिल्ह्याबाहेरून होत असल्याने, स्थानिक शेतीच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन, तसेच देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये अडचणी येत होत्या. स्थानिक शेतकरी आणि प्रशासनाच्या सोयीसाठी, या तलावाचे नियंत्रण सांगली जिल्ह्याकडे हस्तांतरित करण्याची आवश्यकता होती.
याप्रश्नी मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतली. राजेवाडी तलावाशी संबंधित सर्व दस्तऐवज आणि वस्तुस्थिती मांडली. या भेटीत तलावाचे भौगोलिक स्थान, स्थानिक शेतीसाठी त्याचे महत्त्व आणि हस्तांतरणाची तातडीची गरज यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकर्यांच्या हिताचा हा विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. प्रशासनाला विलंब न लावता तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. यामुळे राजेवाडी तलावाचे हस्तांतरण लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.