ST Bus Ashadhi Yatra
सांगलीतून जादा एसटी बस आषाढी यात्रेसाठी सोडण्यात येणार आहे. Pudhari File Photo
सांगली

आषाढी यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातून 260 जादा बस !

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी एसटी महामंडळाने यात्राकाळात सांगली जिल्ह्यातून 260 बसेस सोडण्यात येणार आहे. कोणत्याही गावांतून 40 अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावांतून एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळ सांगलीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले यांनी केले आहे. यात्रेसाठी अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी असे एकूण 25 जणांची पंढरपूरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

आषाढी एकादशी 17 जुलैरोजी असून, जादा बसेस 13 ते 22 जुलैपर्यंत सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली. मागील वर्षी सांगली जिल्ह्यातून एसटीकडून 190 विशेष बसेस सोडल्या होत्या. आषाढी यात्रेसाठी देखील 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.

या आगारातून जाणार इतक्या बसेस...

सांगली 52, मिरज 36, इस्लामपूर 29, तासगाव 41, विटा 18, जत 18, आटपाडी 14, कवठेमहांकाळ 22, शिराळा 18 आणि पलूस आगारातून 14 असे जिल्ह्यातून 260 बस सोडण्यात येणार आहेत.

पावणे दोन कोटींचे उत्पन्न अपेक्षित

आषाढी एकादशीनिमित्त होणार्‍या पंढरपूर यात्रेसाठी सांगली आगाराला 1 कोटी 73 लाख 18हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. गतवर्षी एसटीला 65 लाख 27 हजारांचे उत्पन्न मिळाले होते. यात्रेसाठी सुमारे 25 कर्मचारी, अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी पंढरपूर येथे थांबून राहणार आहेत.

SCROLL FOR NEXT