सांगली : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे सांगली जिल्ह्यातील एसटीचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. दोन दिवसामध्ये तीन हजार एसटीच्या फेर्या रद्द झाल्या आहेत. 235 बसेसचे गणेशोत्सवासाठी अगोदरच बुकिंग झाल्याने आता 7 सप्टेंबरनंतरच एसटीची सेवा सुरळीत होणार आहे.
एसटी कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी एकूण 3 हजार 618 पैकी 1 हजार 511 कर्मचारी दोन दिवस संपावर गेल्याने जिल्ह्यातील पाच आगारांचे काम पूर्णपणे बंद, तर पाच आगारांचे अंशत: कामकाज सुरू होते. संपामुळे दोन दिवसात सुमारे तीन हजार बसफेर्या रद्द करण्यात आल्या होत्या, तर जवळपास 1 लाख 60 हजार कि.मी. एसटीचा प्रवास रद्द करवा लागला. रोजचा सुमारे 75 लाखांचा एसटीचा व्यवसाय होतो. दोन दिवसात सुमारे दीड कोटीचा व्यवसाय बुडाला आहे.
आंदोलनामुळे मिरज, जत, आटपाडी, तासगाव आणि पलूस आगारांतून होणारी सेवा पूर्णपणे बंद होती. उर्वरित सांगली, इस्लामपूर, विटा आणि शिराळा आगारांवर 50 टक्क्याहून अधिक परिणाम झाला होता. आंदोलनकर्त्यांनी बुधवारी रात्री संप मागे घेतला. काल रात्रीपासून कर्मचारी कामावर रुजू झाले
असले तरी यापूर्वीच कोकणामध्ये जाण्यासाठी 235 बस गाड्यांचे बुकिंग झाले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातून आगारांतून आता 7 सप्टेंबरपासून बससेवा सुरळीत होणार आहे. गणेशोत्सवामुळे यापूर्वीच 235 बसगाड्यांचे बुकिंग झाले आहे. दोन दिवसामधील संपामुळे तीन हजार बसेसच्या फेर्या रद्द करण्यात आल्या होता. 7 सप्टेंबरपासून बससेवा पूर्ववत होईल. तोपर्यंत प्रवासी सेवेवर अंशत: परिणाम राहणार आहे.- वृषाली भोसले , विभागीय अधिकारी, एसटी, सांगली.