

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : आपल्या विविध मागण्यांना घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून सध्या तरी गोंदिया आगारातील कर्मचारी या संपात सहभागी झाले असले तरी एसटी बस सेवा सुरळीत आहे. दरम्यान, आज ( दि. ४) सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्री व एसटी कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार असून या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यास गोंदिया आगारातील कर्मचारी देखील संपात पूर्णपणे सहभागी होणार आहेत. त्यामुळे गोंदिया आगारातील एसटी बसची चाके थांबण्याची शक्यता आहे. (ST Employees Strike)
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांनाही वेतन मिळावे, या प्रमुख मागणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून ( दि.३) पासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. कामगार संघटनांनी पुकारलेल्या या संपात भंडारा विभागातील गोंदिया, भंडारा, साकोली, तिरोडा, पवनी, तुमसर या सर्व सहाही आगारातील चालक-वाहकासह सर्वच एसटी कर्मचारी सहभागी झाले आहेत. असे असले तरी गोंदिया व भंडारा आगारातील काही बस सेवा सुरु ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, आज, सायंकाळी, ७ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे हे संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाल्यास संप मागे घेण्यात येणार आहे. तर तोडगा न निघाल्यास, आज सायंकाळपासून राज्यातील एसटी बस सेवा पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. ज्यामध्ये गोंदिया आगारातील एसटी कर्मचारी व चालक-वाहक संपावर जाणार असल्याने गोंदिया जिल्ह्यातील एसटी सेवा देखील बंद करण्यात येईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने कधीही जिल्ह्यातील एस टी बसची चाके थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. असे असतानाच पासधारक विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्गाची गैरसोय होणार आहे.