

मुंबई : प्रलंबित मागण्यासाठी मंगळवारपासून (दि.३) ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यातील एसटीची वाहतुकीचा पुरता खोळंबा झाला आहे. आज (दि.४) सकाळी ८ वाजेपर्यंत राज्यभरातील एसटीच्या २५१ पैकी ६३ आगार पुर्णतः बंद होते. तर ७३ आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर ११५ आगारामध्ये पुर्णतः वाहतूक सुरळीत सुरू होती.
सर्वाधिक गैरसोय आज (दि.४) गावी जाणाऱ्या गणेश भक्तांची होणार आहे. सुमारे १ हजार बस मुंबई, ठाणे व पालघर विभागातून आज रवाना होत आहेत. दुर्दैवाने संपामुळे बाहेरच्या विभागातून तितक्या बसेस उपलब्ध न झाल्यास चाकरमान्यांची गैरसोय होऊ शकते. एसटी प्रशासन वारंवार संपकरी कर्मचार्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन चांगला निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होऊ शकतो. तरी कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे! प्रवाशांची सणासुदीमध्ये गैरसोय करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे.