Supriya Sule Apology to Ajit Pawar Faction Pudhari
महाराष्ट्र

Supriya Sule: रोहित पवारांच्या एका वक्तव्याने वाद पेटला; सुप्रिया सुळेंनी थेट मागितली माफी, म्हणाल्या, 'मी हात जोडून...'

Supriya Sule Apology to Ajit Pawar Faction: सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या वतीने अजित पवार गटाची जाहीर माफी मागितली.

Rahul Shelke

Supriya Sule Apology to Ajit Pawar Faction: रोहित पवार यांच्या एका वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार गटाने रोहित पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी आंदोलनंही करण्यात आलं. या वादावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः पुढाकार घेत रोहित पवारांची बाजू मांडली आहे. एवढंच नाही, तर अजित पवार गटातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर आपण स्वतः माफी मागण्यास तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

नेमकं काय म्हणाले होते रोहित पवार?

पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून रोहित पवार यांनी गुरुवारी एक विधान केलं होतं. पुण्याला अधिक कठोर पालकमंत्री द्यावा किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अधिक ताकद द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

तसंच, पुण्याच्या सध्याच्या पालकमंत्र्यांना अजित पवार यांच्याप्रमाणे काम करता येत नसल्याचंही ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर अजित पवार गटातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. रोहित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत काही ठिकाणी आंदोलनंही करण्यात आलं. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील राजकीय वातावरण तापलं.

सुप्रिया सुळेंनी स्वतः मागितली माफी

या वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता हा विषय पुढे वाढवू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "काल रोहित पवार यांनी जे वक्तव्य केलं, त्याबद्दल त्यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केली आहे. माणूस एकदा सॉरी बोलल्यावर पुढचा वाद उरत नाही. आता राष्ट्रवादीच्या महिला ज्या रोहित यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत, त्यांना माझी विनम्र विनंती आहे की त्यांनी ते चॅनेल पाहावं, ज्यामध्ये रोहितने माफी मागितली आहे."

यावेळी त्यांनी आंदोलन करणाऱ्या महिला नेत्यांशी असलेल्या जुन्या संबंधांचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, या महिला नेत्यांसोबत आपण अनेकदा एकत्र जेवलो आहोत आणि काम केलं आहे. त्यामुळे कदाचित रोहित यांनी माफी मागितल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल.

'रोहितच्या वतीने मी सॉरी म्हणते...'

रोहित पवार यांच्या वक्तव्यामुळे अजित पवार गटातील कोणत्याही नेत्याची, पदाधिकाऱ्याची किंवा कार्यकर्त्याची भावना दुखावली असेल, तर आपण स्वतः माफी मागत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

"रोहितकडून काल अनावधानाने काही कमीजास्त वक्तव्य गेलं असेल, त्याबद्दल रोहितने दिलगिरी व्यक्त केली आहे. माणसाने एकदा दिलगिरी व्यक्त केल्यानंतर विषय संपतो. त्यांची इच्छा असेल तर रोहितच्या वतीने मी सॉरी म्हणते," असं त्या म्हणाल्या.

पुढे त्यांनी हात जोडून अजित पवार गटाला विनंती केली. "रोहित पवारांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील कुठल्याही कार्यकर्त्याच्या, पदाधिकाऱ्याच्या किंवा नेत्याच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर अंतःकरणातून हात जोडून विनम्रपणे सांगते की रोहित पवारांचं किंवा पक्षाचं असं कोणतंही धोरण नाही. मी याबद्दल माफी मागते, दिलगिरी व्यक्त करते, सॉरी म्हणते," असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

रोहित पवार यांनी माफी मागितल्यानंतरही अजित पवार गटाकडून आंदोलनं सुरू असल्याने हा वाद अधिकच चर्चेत आला आहे. आता सुप्रिया सुळे यांनीही पुढाकार घेत जाहीरपणे माफी मागितली आहे. त्यामुळे अजित पवार गटाची भूमिका काय असणार आणि या माफीनंतर आंदोलनं थांबणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT