Zilla Parishad Election Pudhari
रायगड

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना

इव्हीएम व निवडणूक साहित्याचे वितरण पूर्ण; शांततापूर्ण व निर्भय मतदानासाठी प्रशासन सज्ज

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रमेश कांबळे

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी इव्हीएम व बॅलेट युनिटसह आवश्यक सर्व निवडणूक साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत. सकाळपासूनच शासकीय गोदाम व वितरण केंद्रांवर मोठी लगबग पाहायला मिळाली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

निवडणूक साहित्य वितरण केंद्रावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. मतदानासाठी लागणारी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (इव्हीएम), कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट, मतदार यादी, शाई, शिक्के तसेच इतर आवश्यक कागदपत्रे कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रासाठी स्वतंत्र किट देण्यात आले असून, त्याची तपासणी करूनच पुढील कार्यवाही करण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, अतिरिक्त पोलिस कर्मचारी व द्रुत प्रतिसाद पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच निवडणूक साहित्य सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी पोलिसांचे वाहनांद्वारे एस्कॉर्ट देण्यात आले.

मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा

प्रशासनाने मतदान कर्मचाऱ्यांना वेळेत मतदान केंद्रावर पोहोचण्याचे तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदानाच्या दिवशी मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जि.प. निवडणूक शांततेत आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करत पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT