इलियास ढोकले श्रीकृष्ण बाळ
महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या दुर्गराज रायगडाच्या संवर्धनाची जबाबदारी आपण संपूर्णपणे पूर्ण केल्याशिवाय रायगड सोडणार नाही अशा आक्रमक भाषेत युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी सरकारला इशारा दिला आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरीही दुर्गराज रायगडाच्या संवर्धनासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353 व्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आज किल्ले रायगडावर पाच लाखापेक्षा जास्त शिवभक्त ऊन व पाण्याची चिंता न करता उपस्थित होते. या हजारो शिवभक्तांना राजसत्रेवरून युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी मार्गदर्शन केले. ज्या परिस्थितीमध्ये आपण गेल्या तीन दिवसापासून किल्ले रायगडावर राहत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन करतानाच पुढील वर्षी यामध्ये अमुलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येईल अशी हमी देखील त्यांनी दिली.
2007 पासून किल्ले रायगडावर श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केल्याची आठवण देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपण रायगड प्राधिकरणाची स्थापना याच ठिकाणी घोषित करण्यास भाग पाडले होते हे निदर्शनास आणले. रायगड प्राधिकरणाच्या कामाकरिता 606 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. परंतु हा निधी रायगड प्राधिकरणाकडे येत नसून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित यंत्रणेकडे दिला जातो असे त्यांनी स्पष्ट केले. प्राधिकरण गेल्या दहा वर्षापासून कार्यरत असताना देखील रायगड प्राधिकरणाला अपेक्षित असलेली स्वायत्तता दिली गेली नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक कामासाठी आम्हाला मंत्रालयात व दिल्लीला परवानगी मागण्यासाठी जावे लागते अशी खंत व्यक्त केली.
यावेळी त्यांनी रायगड प्राधिकरणाकडून किल्ले रायगड व परिसरात सुरू असलेल्या विविध कामांची माहिती उपस्थित लाखो शिवभक्तांना दिली. ज्या राज सदरेमध्ये आपण बसले आहोत त्या राज्य सदरेची पुनर्बांधणी करण्याचा आपला मनोदय असून या पावसाळ्यानंतर नगारखान्यावरील छत बांधणीचे काम सुरू होईल असे त्यांनी सांगितले. मागील दहा वर्षात किल्ले रायगड व परिसरातील विविध कामांची होत असलेली पूर्तता पूर्णत्वास जात असताना कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, तरी रायगड संवर्धनाच्या कामाबद्दल आपण कायमच सतर्कतेने काम करू असे स्पष्ट केले.
दुर्गराज रायगडसह राज्यातील 18 गडकिल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक नामांकनामध्ये झालेला समावेश येथील संवर्धन व जतन योग्य पद्धतीने न झाल्यास रद्द होऊ शकते अशी भीती व्यक्त केली. तसेच गडाच्या संवर्धनाची असलेली जबाबदारी ची उपस्थितांना जाणीव करून दिली. राज्य शासन राज्यातील विविध ठिकाणी आपल्या कॅबिनेट बैठका घेते एक बैठक राज्य शासनाने किल्ले रायगडावर घ्यावी अशी सूचना त्यांनी याप्रसंगी केली.
साडेतीनशे वर्षाच्या इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. तरीही पहिला स्वतंत्रता दिवस हा 6 जून 16 74 रोजी धर्मांध मोगलीशाहीन विरोधात छत्रपती शिवरायांनी केलेल्या अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याच्या माध्यमातून किल्ले रायगडावर झालेला राज्याभिषेक होता याची त्यांनी आठवण करून दिली. छत्रपतींचा साडेतीनशे वर्षानंतरही इतिहास लक्षात ठेवून देशाचे 2 राष्ट्रपती, 3 पंतप्रधान व मोठ्या संख्येने मुख्यमंत्री राज्यपाल विविध घटकातील मान्यवर नेत्यांनी गडावरती येऊन पाय धूळ केल्याचे नमूद केले. तसेच साडेतीनशे वर्षानंतरही छत्रपतींचा असलेला हा शौर्याचा इतिहास पुढील पिढीसाठी पोचण्यासाठी शिवचरित्र युवकांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दुर्गराज रायगडच्या आज संपन्न झालेल्या 353 व्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे, आमदार मंगेश चव्हाण व आमदार पाटील यांचा नाम उल्लेख करून त्यांनी आगामी काळात किल्ले रायगडासह राज्यातील सर्व गडांच्या संवर्धनासाठी राज्य शासन व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरता सहकार्य करण्याचे आवाहन केले.
राजस्थान व मध्यप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील किल्ले देखणे नाहीत पण ते लढलेले किल्ले असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. दुर्गराज रायगडवरील राज्यसभेमध्ये असलेल्या मेघडंबरीत छत्रपती शिवरायांचा पुतळा या हजारो शिवभक्तांच्या साक्षीनेच आपण बसविला होता याचे स्मरण करून दिले. गेल्या काही वर्षापासून किल्ले रायगडावर सुरू असलेल्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्राप्त होणारे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मागील तीन दिवसापासून प्रतिकूल परिस्थितीमध्ये किल्ले रायगडावर राहिलेल्या शिवभक्तांनी गड उतरून आपल्या घरी जाताना शिस्तबद्ध पद्धतीने जावे व पुढील महिनाभर छत्रपतींच्या कार्याचे आत्मचिंतन करावे; असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले. तसेच आपल्या सुमारे 35 मिनिटांच्या भाषणाच्या अखेरीस त्यांनी लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.