Shivrajyabhishek | हिंदवी स्वराज्याचा महामंत्र ‘शिवराज्याभिषेक’

Shivrajyabhishek |
Shivrajyabhishek | हिंदवी स्वराज्याचा महामंत्र ‘शिवराज्याभिषेक’
Published on
Updated on

प्रा. डॉ. आनंद गिरी

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ऐतिहासिक घोषणा होती. रायगडावरील या सोहळ्याने मराठी जनतेला स्वाभिमान, न्याय आणि सुराज्याचा नवा मार्ग दाखवला.

राज्याभिषेक हे शिवचरित्रातील गौरवशाली प्रकरण असून शिवरायांनी मरगळलेल्या मराठी मनांना हिंदवी स्वराज्याचा महामंत्र देऊन नवे पर्व निर्माण केले. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सह्याद्रीएवढे उत्तुंग आहे. हिंदवी स्वराज्यनिर्मितीबद्दल रामचंद्रपंत अमात्य म्हणतात, “महाराजांनी केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली.” ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी १३, शनिवार, दि. ६ जून १६७४ रोजी रायगडावर छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करवून घेतला. या घटनेबद्दल कृष्णाजी अनंत सभासद म्हणतात, “येणे प्रमाणे राजे सिंहासन रूढ झाले. या युगी पृथ्वीवर मराठा पातशहा एवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.”

प्रत्येक स्वतंत्र राज्याची काही कायमस्वरूपाची ध्येयधोरणे असतात. त्याशिवाय त्या राज्याचे स्वतंत्र स्वरूप दिसून येत नाही. तसेच निश्चित ध्येयधोरणांमुळे राज्य कारभाराची दिशा स्पष्ट होते. त्यातून एक वेगळा दृष्टिकोन प्राप्त होऊन ते त्या राज्याचे नैतिक अधिष्ठान बनते. त्यावरच राज्याची भरभराट होत असते. संपूर्ण भारतवर्षावर कित्येक वर्षे सुलतानशाही व मुघलशाहीच्या राज्यकर्त्यांच्या अनेक पिढ्यांनी राज्य केले. आपण एतद्देशीयांपेक्षा श्रेष्ठ आहोत, ही कल्पना माेगल कधीच विसरले नाहीत. तसेच मुस्लीम सत्ता देशातील छोट्या-मोठ्या सत्ता आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी त्यांना आपआपसात झगडत ठेवून, त्यांच्या प्रजेची धूळधाण कशी करता येईल इकडे लक्ष दिले. त्याचबरोबर त्यांच्यावर वारंवार हल्ले करून तेथील व्यवहारांत अडचणी निर्माण करून त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करण्याचे नेहमीच यशस्वी प्रयत्न केले. एकंदरीत सर्व हिंदुस्थानात मोगल सत्तेची उभारणी करण्याचा त्यांचा मानस होता. याचबरोबर देशात एकच राज्यपद्धत तसेच भाषा, नाणी, वजने, कायदे, न्यायपद्धती व धर्मसुद्धा एकच असावा, असेच त्यांचे धोरण होते.

याला छत्रपती शिवरायांनी सुरूंग लावला व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यापूर्वी मात्र मुस्लीम सत्ताधीशांनी दीर्घकाळ सत्ता उपभोगली होती. कदाचित मुस्लीम सत्ताधीशांनी हिंदूंच्या विकासाकडे पाहिले असते, तर छत्रपतींच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची निर्मिती झाली नसती; परंतु मुसलमानी राजवटीत प्रजेच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. तसेच न्यायही अपवादात्मक होता. अकबर बादशहा सोडला, तर पुढील काळात जास्त करून औरंगजेब बादशहाच्या काळात सर्वत्र बेबंदशाही माजली होती. म्हणूनच छत्रपती शिवरायांची आवश्यकता उत्पन्न झाली. तसेच आणखी महत्त्वाची कारणे आहेत. त्याबाबत बखरकाराने म्हटले आहे, “मोगली राजवटीत ऐसा अंधार कारभार बादशाहीमध्ये कोणी मनास आणित नाही. पैके पावले म्हणजे एकाचे वतन ऐकास देतील. स्त्रियांवर बलात्कार, हिंदूचे खून, हिंदूची मंदिरे फोडणे, गाई मारणे इत्यादी प्रकार उघडपणे सर्व समाजापुढे घडत होते. प्रजाहितदक्ष व परधर्मसहिष्णुवृत्ती लोप पावली होती.”

हिंदूंची होणारी सामाजिक व धार्मिक पीछेहाट दूर व्हावी. हिंदूंचे मूलभूत हक्क त्यांना परत मिळावेत, त्याचबरोबर एकंदरीत बेबंदशाहीचा शेवट होऊन हिंदूपातशाही निर्माण होऊन खऱ्याअर्थाने घटनात्मक महत्त्व देणाऱ्या राज्याभिषेकाची आवश्यकता होती. ती छत्रपती शिवरायांनी राजधानी रायगडावर ६ जून १६७४ रोजी सत्यात आणली. मुसलमान शाह्यांनी विजयनगरच्या वैभवशाली हिंदू साम्राज्याचा नाश घडवून आणला होता. या भयानक विध्वंसाचे हिंदूंना विस्मरण होणे अवघड होते. म्हणूनच छत्रपती शिवरायांच्या रूपाने हिंदू सत्तेचे पुनरुज्जीवन होऊन हिंदूंना राजा मिळाला. त्यासाठीच महाराजांना कायदेशीररीत्या राजपद निर्माण होणे महत्त्वाचे वाटले म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करवून घेतला.

त्याकाळी अनेक मराठा जहागीदार, वतनदार स्वतःला राजा म्हणवून घेत होते. खुद्द महाराजांचे वडील शहाजीराजे हे राजे होतेच; परंतु मुसलमानी सत्तेचे चाकर होते. म्हणून शिवरायांना खरेखुरे राजपद हवे होते. तत्कालीन काही परकीय राजसत्तांनी महाराजांना बंडखोर, जहागीरदाराचा पुत्र म्हणून मानले होते. या विचाराला शह द्यावयाचा होता. त्यासाठी राज्याभिषेक करवून घेणे अत्यंत महत्त्वाचे होते. त्यानुसार हिंदू जनतेवर अत्याचार होता कामा नये, असाही इशारा महाराजांना परकीय सत्तांना द्यावयाचा होता. म्हणूनच राज्याभिषेक करवून घेऊन कायदेशीर अडचणी दूर करावयाच्या होत्या. तसेच प्रजेवरही राजा हा सर्वश्रेष्ठ आहे, असे बंधन राहणार होते. त्याचबरोबर इनामपत्रे, करारनामे हे छत्रपतींच्या अधिकाराखालीच होणे गरजेचे होते. त्याचबरोबर कर वसूल करणे, नवे कर जारी करणे, न्यायदान करणे, शिक्षा अथवा अनुग्रह करणे इत्यादी राज्यकारभाराच्या बाबींना राजपद निर्माण न केल्याने अडचणी होत्या. त्या राज्याभिषेक झाल्यानंतर दूर झाल्या. तसेच चातुर्वर्ण व्यवस्थेचीही न्यायदानाच्या बाबतीत अडचणी होत्या. त्यासाठी राजपद निर्माण होणे गरजेचे होते.

एकंदरीत राज्याभिषेक हा संस्कार असला, तरी प्रजेवर छाप पडणे गरजेचे होते. त्यातून सार्वभौम व स्वतंत्र राज्याची घटनात्मक निर्मिती होणार होती. तसेच त्याकाळात या जगात क्षत्रियच नाहीत, या कल्पनेला मूठमाती देऊन आपण क्षत्रिय आहोत, हे दाखवून दिले व स्वतः शिसोदिया या उदयपूरच्या राजपूत राजघराण्यातील आहोत, ही वंशावळ शिवरायांनी प्राप्त केली. त्यानुसार हिंदू जगतामधील प्रसिद्ध असलेल्या विश्वेश्वर ऊर्फ गागाभट्ट या महापंडिताला राज्याभिषेकाचे पौराहित्य स्वीकारण्यास पाचारण करून त्याला रायगडावर आणले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याभिषेकाची तयारी करून हा सोहळा शिवाजी महाराजांनी संपन्न केला. त्यानुसार मराठाला साम्राज्याला राजा मिळाला. त्यामुळे इस्लाम जगताला मोठा धक्का बसला. महाराजांनी स्वतंत्र, सार्वभौम राज्याची स्थापना करून इस्लामी सत्तेला आव्हान दिले व मराठ्यांच्या या स्वराज्यात नव्या राज्यकारभार पर्वाला सुरुवात झाली. त्यांनी जनतेला सुराज्याचे वचन दिले व एक धर्मसिद्ध राज्यसंस्थेची स्थापना केली. एकंदरीत सर्व समाज शासनबद्ध झाला. राज्याभिषेकाने घटनात्मकदृष्ट्या स्वतंत्र व सार्वभौम राज्य निर्माण झाले. शिवाजी राजांनी स्वतःला छत्रपती हे बिरूद लावले. छत्रपती म्हणजे छत्रधारण करणारा राजा. या छत्राखाली सर्व जाती-धर्मांतील प्रजेला न्यायाने व धर्माने वागविले जाईल, त्यांचे संरक्षण केले जाईल, असे आश्वासन बिरुदाला आहे. या राज्याभिषेकाने नव्या शतकास सुरुवात झाली. त्यानुसार स्वतःची नाणी (शिवराई, होन) पाडण्यास सुरुवात करून राज्यकारभारात नवे युग शिवाजी महाराजांनी निर्माण केले. महाराजांनी वैदिक व तांत्रिक असे दोन राज्याभिषेक करून सर्व संत, महंत, तांत्रिक यांना समाधानी केले. एकंदरीत आपल्या स्वराज्यात शिवाजी महाराजांनी धार्मिक, सामाजिक समतेला राज्याभिषेकातून सुरुवात केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news