सुवर्णा दिवेकर
अलिबाग: दहीहंडीचा थर... खाली गोविंदांचा उत्साह... आणि वर हंडी फोडण्यासाठी सज्ज झालेल्या महिला गोविंदांचा जोश! दहीहंडी म्हटली की काही वर्षांपूर्वी केवळ पुरुष गोविंदा पथकांचे चित्र डोळ्यासमोर यायचे.
मात्र, आता हे चित्र झपाट्याने बदलत आहे. महिलांनीही दहीहंडीच्या मैदानात दमदार प्रवेश केला असून, पुरुषांच्या बरोबरीने उंचच उंच मानवी मनोरे रचत हंडी फोडण्याचे आव्हान त्या लीलया पेलत आहेत. अलिबागसह रायगड जिल्ह्यातील निमशहरी आणि ग्रामीण भागात महिला गोविंदा पथकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.
गृहिणी, नोकरदार महिला, महाविद्यालयीन तरुणी, शाळकरी मुली अशा विविध वयोगटातील महिला एकत्र येऊन दहीहंडीच्या सरावात सहभागी होत आहेत. घरातील जबाबदाऱ्या, नोकरी, शिक्षण आणि दैनंदिन कामकाज सांभाळून या महिला नियमितपणे सराव करत आहेत. त्यामुळे दहीहंडी हा केवळ उत्सव किंवा मनोरंजनाचा भाग न राहता महिलांसाठी आत्मविश्वास, संघभावना आणि शारीरिक तंदुरुस्ती दाखविण्याचे व्यासपीठ ठरत आहे.
आत्मविश्वास, जिद्द आणि संघभावनेची कसोटी
दहीहंडीच्या थरावर चढून हंडी फोडणे हे दिसते तितके सोपे नाही. त्यासाठी शारीरिक ताकद, संतुलन, एकाग्रता, आत्मविश्वास आणि संघातील प्रत्येक सदस्यावर असलेला विश्वास महत्त्वाचा असतो. एक थर रचताना प्रत्येक गोविंदाची भूमिका ठरलेली असते. खालच्या थरातील गोविंदांनी संपूर्ण मनोऱ्याचा भार सांभाळायचा, तर वरच्या थरातील गोविंदांनी संतुलन राखत हंडीपर्यंत पोहोचायचे असते.
यासाठी दहीहंडीच्या साधारण महिनाभर आधीपासून महिला पथकांचा सराव सुरू होतो. सुरुवातीला मूलभूत व्यायाम, संतुलन आणि एकमेकांमध्ये समन्वय साधण्याचा सराव केला जातो. त्यानंतर हळूहळू थरांची उंची वाढवली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष दहीहंडीच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी महिला गोविंदा पथके विशेष मेहनत घेत आहेत.
अलिबागमधील पचनाका गोविंदा महिला पथक गेल्या १३ वर्षांपासून दहीहंडी उत्सवात सहभागी होत आहे. या पथकात चार वर्षांच्या चिमुकल्या मुलींपासून ते ४० वर्षांपर्यंतच्या महिलांचा सहभाग आहे. घरत आळी येथे राहणारे प्रसाद अनंत पाटील या पथकाला प्रशिक्षण देतात. दहीहंडीच्या साधारण महिनाभर आधी पथकाच्या सरावाला सुरुवात होते.
पथकातील प्रियांका पाटील यांच्या माहितीनुसार, आक्षी येथील मानाची हंडी फोडण्यासाठी दरवर्षी या पथकाला आमंत्रित केले जाते. त्यानंतर पेझारी, अलिबाग येथील भाजप पुरस्कृत दहीहंडी स्पर्धा, तसेच शेतकरी भवन येथेही पथक दहीहंडी उत्सवात सहभागी होते.
या पथकाने आतापर्यंत दहीहंडी स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे मिळवली आहेत. आदर्श मित्रमंडळाचेही पथकाला सातत्याने सहकार्य आणि प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रियांका पाटील यांनी सांगितले. महिलादेखील या साहसी खेळात पुरुषांपेक्षा कमी नाहीत, हे आपल्या कामगिरीतून दाखवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिला गोविंदा पथकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहभागी महिलांचा विविध क्षेत्रांतील सहभाग. काही महिला गृहिणी आहेत, तर काही नोकरी करतात. काही महाविद्यालयीन तरुणी आहेत, तर काही शाळकरी मुली आहेत.
घरातील कामे आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर या महिला सरावासाठी वेळ देतात. महिलांच्या या सहभागाला कुटुंबीयांकडूनही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. सुरुवातीला काही कुटुंबांमध्ये या खेळाबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, नियमित सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि सुरक्षिततेची काळजी घेतल्याने कुटुंबीयांचाही विश्वास वाढला आहे.
अलिबाग शहरालगतच्या गोंधळपाडा येथील महिला गोविंदा पथकाचाही उत्साह उल्लेखनीय आहे. एकमेकींचा उत्साह वाढवत थर रचण्याचा सराव केला जातो. ग्रामस्थांकडून मिळणारे सहकार्य आणि प्रोत्साहन यामुळे पथकातील महिलांचा आत्मविश्वास आणखी वाढत आहे.
गोपिका पथकांच्या संख्येत वाढ
रायगड जिल्ह्यात सध्या साधारण ३० महिला गोविंदा पथके असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे दरवर्षी या पथकांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरांपुरता मर्यादित असलेला हा सहभाग आता ग्रामीण भागातही पोहोचत आहे.
गावागावांत महिलांचे स्वतंत्र गोविंदा पथक तयार होऊ लागले आहे.महिला गोविंदा पथकांना मिळणारे वाढते प्रोत्साहन, दहीहंडी आयोजकांकडून दिली जाणारी संधी आणि कुटुंबीयांचा पाठिंबा यामुळे हा सहभाग अधिक व्यापक होत आहे. त्यामुळे आगामी काळात रायगडमधील दहीहंडी उत्सवात महिला गोविंदा पथकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.