रायगड ः निळाशार समुद्र, घोंघावणारा वारा आणि मनप्रसन्न करणारे वातावरण यामुळे रायगडच्या हिवाळी पर्यटनाला बहर आला आहे. या बहरलेल्या पर्यटनामुळे जिल्हयाचे अर्थचक्रही गतीमान होताना दिसत आहे. स्थानिक हॉटेल्स, रिसॉर्ट, कॉटेजेस यांना वाढती मागणी असून त्यांचाही व्यवसाय तेजित आला आहे. गुलाबी थंडीबरोबरच जिल्ह्यात ठिकठिकाणी होत असलेल्या यात्रोत्सवामुळे पर्यटकांसह स्थानिकांची पावले गावाकडे वळू लागल्याने गावांनाही जाग आलेली आहे. पुढील काही दिवस हे वातावरण असेच अल्हाददायक राहणार असून त्याचा फायदा स्थानिकांना होणार आहे.
रायगड जिल्हयातील हिवाळी पर्यटनाला सध्या खऱ्या अर्थाने बहर आला आहे. रायगड जिल्हयातील अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. अलिबाग तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांना मुंबईसह शहरांतील पर्यटकांकडून पसंती दिली जात आहे. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का ते मांडवा मार्गावरून हजारो पर्यटक अलिबागमध्ये दाखल होत आहे. पर्यटकांमुळे समुद्र किनारे हाऊसफुल्ल आहेत. तसेच हॉटेल, कॉटेजेस, रिसॉर्टची बुकींग फुल्ल झालेल्या व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. मुरुड तालुक्यातील काशिद आणि मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांवर हजारो पर्यटक दाखल झाले आहे. समुद्र किनाऱ्यांवर साहसी खेळ, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत येथील पर्यटनाचा आनंद पर्यटककांकडून घेतला जात आहे.
रायगड जिल्हयात सध्या विविध ठिकाणी जत्रोत्सव सुरु आहे. काही भागात ग्रामदेवतांचे उत्सवही सुरु आहेत. यामुळे पर्यटकांसही शहरात नोकरीनिमित्त गेलेले स्थानिक नागरिक पुन्हा आपल्या गावी आले असून गावांतील कार्यक्रमांबरोबर स्थानिक नागरिक ही पर्यटनाचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय रविवारी असलेली संकष्ट चतुर्थी यामुळे जिल्हयातील पाली येथील श्रीबल्लाळेश्वर, महड येथील श्रीवरद विनायक ही अष्टविनायक क्षेत्रे, अलिबाग येथील कुलाबा किल्ला येथील श्रीसिद्धीविनायक, उरणमधील चिरनेरचा गणपती आदी ठिकाणच्या गणेश मंदिरामध्ये स्थानिकांसह पर्यटकांची गर्दी वाढली आहे. दरम्यान, जिल्हयात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे अनेक भागात रस्त्यावरील खड्डे, नादुरुस्त रस्ते यामुळे वाहतुक कोंडीची समस्यांना पर्यटकांना सामोरे जावे लागत आहे.