कशेडी घाट : कच्चे रस्ते व दरडी कोसळत असल्याने हा घाट धोकादायक ठरतो. pudhari photo
रायगड

Kashedi Ghat News: वरंधा, कशेडी घाटातील धोकादायक दरडींचा बंदोबस्त कधी ?

पावसाळ्यात दाट धुक्यांमुळे अपघात, रस्ते खचण्याचे प्रमाणही वाढलेलेच

पुढारी वृत्तसेवा

रायगड : जयंत धुळप

धुवाँधार पाऊस, वेगाने वाहणारे वारे आणि दाट धुक्यात सह्याद्रीतील तीव्र उताराचे घाट रस्ते अधिकच धोकादायक बनतात. सह्याद्रीच्या उंचच उंच कड्यांवरून कोसळणाऱ्या दरडी अनेकदा वाहनांचा कपाळमोक्ष करतात. सह्याद्री पर्वतरांगेतील १२ घाट रस्त्यांमधील धोकादायक ठिकाणांचा घेतलेला आढावा.

निसर्गरम्य कोकणाच्या सह्याद्री पर्व रांगेतील घाट रस्ते पावसाळ्यात दरडी कोसळणे, दाट धुके आणि रस्ते खचणे यामुळे वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. पावसाळ्यात सातत्याने अपघात होत असल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला असतो. यावर गेल्या १०-१५ वर्षांत कायमस्वरूपी उपाययोजना झालेल्या नाहीत.

महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान आंबेनळी हा ४० किमीचा अत्यंत अरुंद घाट आहे. येथे दापोली कृषी विद्यापीठाच्या बस अपघातासह (३४ मृत्यू) अनेक भीषण अपघात झाले आहेत. 'दाभीळ टोक' येथील तीव्र वळण, तर 'मेटतळे' आणि 'रानबाची वाडी' भागातील डोंगरावरून कोसळणारे दगड प्रवाशांसाठी धोक्याचे आहेत.

वरंधा घाट : हा घाट मार्ग जागोगागी उखडला असून, वाहनचालकांचे हाल होत आहेत.

कशेडी घाट (पोलादपूर ते खेड)

मुंबई-गोवा महामार्गावरील या घाटाखाली नवीन 'कशेडी बोगदा' सुरू झाल्याने वेळ वाचत असला, तरी जुन्या घाटातील धोका कायम आहे. पर्यटन आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक अजूनही जुन्या मार्गाचा वापर करतात, जेथे तीव्र वळणे आणि उतारावर वाहनांचे ब्रेक फेल होऊन अपघात होत आहेत.

वरंधा घाट (भोर ते महाड)

वाहतुकीसाठी सर्वात असुरक्षित असलेल्या या घाटात संरक्षक भिंती तुटल्या असून रस्ता खचण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे पावसाळ्यात हा घाट पूर्णपणे बंद करावा लागतो. 'वाघजाई मंदिरा' जवळील १५०० फूट खोल दरी आणि 'शिरगाव घाटमाथा' येथील वारंवार होणारी वाहतूक कोंडी अपघातांना कारणीभूत ठरत आहे.

प्रवाशांनो, ही खबरदारी घ्या

  • पावसाळ्यात वेग मर्यादित ठेवा

  • रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा

  • वाहनांचे ब्रेक व टायर तपासा

  • दरड कोसळण्याच्या सूचना तपासा

  • इंधन-मोबाईल चार्जिंगची पूर्वतयारी ठेवा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT