रायगड ः 1 जानेवारी 2026 पासून अंत्योदय शिधापत्रिका धारकांना शासन पुर्वी प्रमाणे प्रती कार्ड 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू मिळणार आहे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू या प्रमाणात धान्य दिले जाणार आहे.
रेशन कार्डवर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबांसाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच रोजच्या जेवणाची चिंता कमी करणाऱ्या शिधावाटप व्यवस्थेमध्ये 1 जानेवारी 2026 पासून हा बदल लागू होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून धान्य वाटपाच्या प्रमाणात बदल सुरू होते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत येणाऱ्या अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत शासनाने तात्पुरते बदल केले होते. गव्हाचा साठा कमी असल्याने तांदळाचे प्रमाण वाढवून गहू कमी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू दिला जात होता.
मात्र आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे. अन्नधान्य साठा व्यवस्थापन आणि वितरणामध्ये पुन्हा समतोल साधण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2026 पासून पुन्हा आधीचे नियतन प्रमाण लागू करण्यात येणार आहे.
डिसेंबर 2025 महिन्यासाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. डिसेंबरमध्ये सध्या लागू असलेल्या प्रमाणानुसारच धान्याचे वाटप होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जानेवारीपासूनच हा बदल प्रत्यक्षात दिसून येईल. ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी, रोजंदारीवर जगणाऱ्या कुटुंबांसाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जात आहे. गहू वाढल्याने पोळी, भाकरीसाठी लागणारे धान्य पुन्हा पुरेसे मिळणार आहे.
प्रशासनाने लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या या बदलाची नोंद घ्यावी आणि कोणतीही अफवा न ऐकता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे. रेशन दुकानात धान्य घेताना नियतन प्रमाण तपासून घ्यावे, असेही सांगण्यात आले आहे.
एकूणच, नव्या वर्षात शिधापत्रिकाधारकांसाठी धान्य वाटप पुन्हा जुन्या मार्गावर येत असल्याने अनेकांच्या मनात समाधानाची भावना आहे. रोजच्या अन्नाचा प्रश्न थोडासा हलका करणारा हा निर्णय खरंच लाखो कुटुंबांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
शिधापत्रिकेवरील गुहू तांदूळ देण्याचे प्रमाण राज्यात सर्वत्र सारखेच आहे ते योग्य नाही. जेथे तांदूळ जास्त खाल्ला जोतो तेथे तांदूळ तर जेथे गहू जास्त खाल्ला जातो तेथे गहू अधिक द्यावा अशी आमची शासनाकडे मागणी आहे. कोकणात विशेषतः आदिवासी क्षेत्रात गहू खाल्ला जात नाही येथे तांदूळ खाल्ला जातो. ही क्षेत्र निहाय परिस्थिती विचारात घेवून धान्य वितरण होणे आवश्यक आहे.कोकणात गव्हापेक्षा तांदुळ अधिक देण्ो गरजेचे आहे.उल्का महाजन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सर्वहारा जनआंदोलन