

पालघर : ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण शेतकऱ्यांच्या धान्य खरेदीतील अडचणी, दर, नोंदणी प्रक्रिया तसेच प्रत्यक्ष खरेदीदरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जव्हार येथे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान महामंडळाचे संचालक सुनील भुसारा व दिलीप पटेकर यांनी भूषविले.
या बैठकीत शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करताना येणाऱ्या अडचणी, हमीभाव वेळेत न मिळणे, कागदपत्रांची गुंतागुंत, केंद्रांवरील मनुष्यबळाचा अभाव, वाहतूक खर्च तसेच खरेदी केंद्रांची अपुरी संख्या याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील शेतकऱ्यांना धान्य विक्रीसाठी दूरवर जावे लागत असल्याने त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे मत बैठकीत मांडण्यात आले.
संचालक सुनील भुसारा यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी गांभीर्याने घेत धान्य खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक करण्याचे निर्देश दिले. ‘शेतकऱ्यांना योग्य दरात आणि वेळेत पैसे मिळणे हे महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवणे, कर्मचारी व्यवस्था सक्षम करणे आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील,’ असे त्यांनी सांगितले.
दिलीप पटेकर यांनीही शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. आगामी खरेदी हंगामात कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही, यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक प्रतिनिधी तसेच ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला.