पंकज ठाकूर
कोप्रोली (उरण) ः उरण पूर्व विभागातील चिरनेर -दिघोडे या मार्गावरून पनवेल गाठण्यासाठी वाघधोंडी मार्ग गव्हाण फाट्या लगत बंद असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्ग लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोप्रोली -चिरनेर दिघोडे या भागातून प्रवासासाठी या मार्गाचा वापर गेल्या अनेक दशकाहून अविरत चालू होता. परंतु वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी येथे गव्हाण फाट्याजवळ उड्डाण पुलांचे काम गेल्या 3 ते 4 वर्षापासून सुरू असल्याने या भागाची वाहतूक बंद करण्यात आली होती. वाघ धोंडी मार्ग म्हणजे छोटे खाणी घाटमार्ग असल्याने याला नैसर्गिक महत्व होते; परंतु येथे अविकसित विकास कामांमुळे या भागाची भौगोलिक रचनाच बदलली गेली आहे. सदर मार्ग लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी आता जोर धरू लागली असल्याचे बोलले जात आहे. तर कोप्रोली, चिरनेर, दिघोडे, वेश्वी, जांभूळपाडा या भागांतील जनतेला पनवेल या मार्गावरुन जलद जाता येत होते परंतु सदर मार्ग गेल्या 3 ते 4 वर्षापासून बंद असल्याने या मार्गावरून लालपरी (एस टी) जी एका तासाने पोहोचत होती, त्या एसटी बसला जास्त वेळ लागत असल्याचे बोलले जात आहे .
याच मार्गावरील वेश्वी, जांभूळ पाडा यांचा एसटी शी तेव्हापासून संपर्क तुटला असून येथील जनतेला जास्तीत जास्त पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. वाघधोंडी मार्ग लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी येथील जनतेमार्फत करण्यात येत आहे. हा मार्ग म्हणजे एक अल्हाददायक प्रवासाचा आनंद देत होता. पावसाळी दिवसांत तर एक वेगळाच अनुभव एसटीच्या खिडकीतून डोकावताना येत होता. तर थंडीमध्ये तर वारा अंगाला झोंबत होता पण गेल्या 3 ते 4 वर्षापासून सदर मार्ग बंद असल्याने हा अनुभव आता अनुभवता येत नसल्याचे प्रणय ठाकूर यांनी बोलताना सांगितले तर हा मार्ग लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणीही या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेकांनी बोलून दाखवली आहे.