रायगड : विरार-अलिबाग कॉरिडॉरचे भूसंपादनाचे आर्थिक अडचणीमुळे रखडलेले काम आता राज्य सरकारने भूसंपादनासाठीच्या 22 हजार 500 कोटी रुपयांच्या कर्जासाठी हमी दिल्याने मार्गी लागले असून अंतिमतः भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य सरकारने या कर्जासाठी हमी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) हुडकोकडून 22 हजार 500 कोटी रूपयांचे कर्ज उपलब्ध झाले आहे. आर्थिक अडचण दूर झाल्याने आता महिन्याभरात भूसंपादनाच्या कामास वेगाने सुरुवात केली जाणार असून, आगामी तीन महिन्यात मार्च अखेरपर्यंत 70 टक्के भूसंपादन पूर्ण करण्याचे नियोजन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे.
नवघर ते बलवली 98 किमीच्या टप्प्याचा प्रस्ताव सादर
विरार ते अलिबाग प्रवास अतिजलद करण्यासाठी विरार-अलिबाग कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नव्हती. आर्थिक कारणांमुळेच या प्रकल्पाचे भूसंपादन रखडले आहे. आता मात्र नवीन वर्षात या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे आहे. यानुसार एमएसआरडीडीने 129 किमीच्या विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गीकेतील नवघर ते बलवली या 98 किमीच्या मार्गिकच्या बांधकामासाठी बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्वानुसार निविदा काढण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
महिन्याभरात भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ
दरम्यान पहिल्या टप्प्यातील भूसंपादनासाठी हुडकोकडून कर्ज घेण्यासाठी राज्य सरकारने हमी दिल्यानंतर आता हुडकोकडून 22 हजार 500 कोटींचे कर्ज मिळल्याचे वरिष्ठ अदिकाऱ्यांनी सांगितले. कर्ज मिळाल्याने आता महिन्याभरात भूसंपादनाच्या प्रक्रियेस सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यासाठी अंदाजे 1062 हेक्टर इतकी जमीन संपादित करावी लागणार आहे.
तीन महिन्यात 70 टक्के भूसंपादन पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र नियामक प्राधिकरणाने (एमसीझेडएम) या मार्गिकच्या पर्यावरण परवानगीसंबंधी नव्याने प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशाप्रमाणे लवकरच नव्याने प्रस्ताव पाठवून परवानगी घेण्यात येईल, प्रकल्पाच्या कामास शक्य तितक्या लवकर सुरुवात करण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व प्रक्रियांना वेग देण्यात आल्याचेही अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
अलिबाग-वडखळ महामार्ग टप्प्याचेही काम लागणार मार्गी
सद्यस्थितीत कोणीही वाली नसलेल्याने अंत्यत गंभिर दुरवस्थेत असलेला अलिबाग-वडखळ हा महामार्ग टप्पा देखील विरार-अलिबाग कॉरिडॉरचाच भाग असल्याने या मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामास देखील गती मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.