म्हसळा : संपूर्ण रायगड जिल्ह्याचे राजकीय दृष्ट्या लक्ष लागून राहिलेल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असलेल्या म्हसळा तालुक्यातील वारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता महेंद्र पेरवी आणि उपसरपंच किरण काशिराम चाळके यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव आवश्यक मतसंख्या न मिळाल्याने नामंजूर करण्यात आला आहे.
8 जानेवारी 2026 रोजी म्हसळा तहसीलदार सचिन खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष सभेत अविश्वास ठरावाबाबत हा निर्णय घेण्यात आला. सरपंचांवर मनमानी कारभार व गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते तसेच उपसरपंच मुंबईत वास्तव्यास असल्याने ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र सभेमध्ये या आरोपांबाबत कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. हात वर करून घेण्यात आलेल्या मतदानात एकूण 8 सदस्यांपैकी 5 सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने तर 3 सदस्यांनी विश्वासाच्या बाजूने मतदान केले. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी किमान 6 मतांची आवश्यकता होती. एक मत कमी पडल्याने सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधातील दोन्ही अविश्वास ठराव नामंजूर झाले. या आयोजित सभेत अविश्वास ठराव नामंजूर झाल्याने सरपंच कविता महेंद्र पेरवी आणि उपसरपंच किरण काशीराम चालके यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
अविश्वास ठरावाच्या बाजूने अस्मिता सुनीत सावंत, मीना चंद्रकांत पाटील, जगन्नाथ काशिराम पाटील, अल्तमश हबीब काझी आणि गुलजार नवाज काझी यांनी तर अविश्वास ठरावाच्या विरोधात कविता महेंद्र पेरवी, समीक्षा सुधीर वारळकर आणि किरण काशिराम चाळके यांनी मतदान केले.
8 जानेवारी 2026 रोजी म्हसळा तहसीलदार सचिन खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष सभेत अविश्वास ठरावाबाबत हा निर्णय घेण्यात आला.
वारळ ग्रामपंचायतीमधील अविश्वास ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादातून आणण्यात आल्याची चर्चा ग्रामस्थ व मतदारांमध्ये सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळी, तालुका पदाधिकारी यापुढे काय भूमिका घेतात? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
‘वारळ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व उपसरपंच यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव हा काही सदस्यांचे गैरसमजूतीतून आणि पक्षाचे काही तालुका पदाधिकारी यांचे पाठिंब्यामुळे व विरोधकांकडे छुपी हातमिळवणी करून आणला गेला होता. परंतु आम्ही जनतेचे काम प्रामाणिकपणे करित असल्याने अविश्वास ठराव फसला गेला आहे. आगामी काळात आमचे नेते, खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांचे सहकार्याने ग्रामपंचायतीमध्ये अधिकाधिक विकास कामांचे माध्यमातून जनतेची सेवा करून विरोधकांना कामातून उत्तर देण्यात येईल.कविता महेंद्र पेरवी, सरपंच, ग्रामपंचायत वारळ, म्हसळा