नेरळ : एकीकडे केंद्र व राज्य सरकारांकडून देश विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असल्याचा गवगवा केला जात असला, तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था पाहिल्यानंतर हा विकास नेमका कुठे पोहोचला, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. कर्जत तालुक्यातील वंजारवाडी गावाच्या पुढे, नदी पुलाच्या अलिकडे मुख्य रस्त्यावर पडलेल्या महाभयंकर खड्ड्यांनी वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
या मार्गावर ठिकठिकाणी अक्षरशः जीवघेणे खड्डे पडले असून त्यातून वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली आणि व्याप्ती लक्षात येत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार अथवा चारचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटून गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिकच धोकादायक ठरत आहे. पाण्याखाली लपलेला खड्डा अचानक समोर आल्यास दुचाकी घसरून चालक रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे “रस्ता की मृत्यूचा सापळा?” असा संतप्त सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
वाहनांचे नुकसान; नागरिकांना आर्थिक भुर्दंड- खड्ड्यांमधून वाहनांची सतत ये-जा होत असल्याने टायर, रिम, सस्पेन्शनसह वाहनांच्या विविध भागांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून करण्यात येत आहेत. परिणामी रोजच्या प्रवासासोबतच वाहन दुरुस्तीचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंडही नागरिकांना सहन करावा लागत आहे.
सततच्या त्रासामुळे वाहनधारकांचा संयम आता सुटू लागला असून प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला असतानाही संबंधित यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप केला जात आहे.
अपघात होण्याची वाट पाहण्यापेक्षा त्यापूर्वीच रस्त्याची पाहणी करून जीवघेणे खड्डे बुजविणे, रस्त्याची आवश्यक डागडुजी करणे आणि वाहतूक सुरक्षित करणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी नाही का, असा सवाल आता जोर धरू लागला आहे.
वंजारवाडीच्या पुढील या मुख्य रस्त्याची संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत आणि रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक आणि वाहनधारकांकडून होत आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रशासनाने जागे होऊन हा मार्ग सुरक्षित करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खड्डे चुकवायचे तरी कसे?
रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या आणि व्याप्ती पाहता वाहनधारकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. खड्डा चुकविण्यासाठी वाहन बाजूला घेतले तर समोरून येणाऱ्या वाहनाला धडकण्याचा धोका; तर खड्ड्यातून वाहन नेले तर वाहनाचे नुकसान आणि अपघाताची शक्यता, अशा कोंडीत चालक सापडले आहेत.
जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?
“या रस्त्यावर मोठा अपघात होऊन एखाद्या निष्पाप वाहनधारकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार आहेत का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.