उरण: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उरण तालुक्यात उन्हाचा कडाका वाढला असून, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीपातळी वेगाने खालावत आहे. येथील रानसई आणि पुनाडे या दोन मुख्य धरणांमध्ये मिळून सध्या केवळ 47.65 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ही स्थिती काहीशी समाधानकारक असली, तरी मान्सून आगमनापर्यंत म्हणजेच पुढील दोन ते अडीच महिने हे पाणी पुरवून वापरण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि नागरीकरणामुळे उरणमध्ये पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. सध्या दोन्ही धरणांमधून दररोज 38 दशलक्ष लिटर पाणी उपसा केला जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होत आहे.
रानसई धरणाबाबत जुलै अखेरपर्यंत पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाला सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. पुनाडे धरण लघुपाटबंधारे विभाग आणि पुनाडे आठ गाव पाणीपुरवठा समितीला पाणीसाठ्याचे व्यवस्थापन करावे लागेल.
प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे उरणमधील चाणजे आणि इतर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षीही रानसई ग्रामपंचायत हद्दीतील खैरकाटी, बंगल्याची वाडी, सागाची वाडी, मार्गाची वाडी आणि चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील केळाचा माळ, चांदायणी वाडी या 6 आदिवासी वाड्यांवर पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे.
चिरनेर ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील केळाचा माळ व चांदायणी वाडीसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी लावून धरली आहे. उरण पंचायत समितीने पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या उप अभियंता रुपाली म्हात्रे यांनी दिली आहे.
पाणीसाठा मर्यादित असल्याने उरणकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी आता उरणच्या जनतेतून होत आहे.
वाढत्या उष्म्याने पाण्याचे साठे कमी होत आहेत. टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत.- प्रशासन, पाणी पुरवठा विभाग, उरण