Uran Nagarparishad News pudhari
रायगड

Uran Nagarparishad News: उरण पालिकेची 15 एप्रिलला विशेष सभा होणार; जिल्हाधिकारी यांचे आदेश

तहसिलदारांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

उरण: उरण नगरपरिषदेमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपा गटनेते आणि नगरसेवकांनी मागणी केलेल्या विशेष सभेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर पिठासीन अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. नगराध्यक्षांनी विहित मुदतीत सभा न बोलावल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तहसिलदार उरण यांची या सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ही सभा 15 एप्रिल रोजी होणार आहे.

उरण नगरपरिषदेचे गटनेते जविंद्र लक्ष्मण कोळी आणि इतर 11 नगरसेवकांनी 11 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमातील कलम 81(2) नुसार एका विशेष सभेचे आयोजन करण्याची मागणी नगराध्यक्षांकडे केली होती. नियमानुसार, अशा विनंतीनंतर 15 दिवसांच्या आत सभा बोलावणे आवश्यक होते. मात्र, नगराध्यक्षांकडून या सभेचे आयोजन न झाल्याने नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती.

नगरसेवकांच्या तक्रारीची आणि मुख्याधिकाऱ्यांच्या पत्राची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने निर्णय घेतला. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 81(3) नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी ही विशेष सभा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. ही विशेष सभा 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता उरण नगरपरिषद कार्यालयात पिठासीन अधिकारी तहसिलदार, उरण यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या सभेमध्ये होणाऱ्या कामकाजाचा पूर्ण अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे निर्देशही प्राधिकृत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नगरपरिषदेची ही विशेष सभा कोणत्या विषयावर होणार आणि त्यात काय निर्णय घेतले जाणार, याकडे आता संपूर्ण उरण शहराचे लक्ष लागले आहे.

विशेष सभा घेण्याचे आदेश

27 मार्च रोजी उरण नगरपरिषदेची सभा बोलावली होती मात्र त्या सभेला भाजपाचे 12 सदस्य उपस्थित नव्हते त्यामुळे कोरम अभावी ती सभा तहकूब करावी लागली होती. मात्र त्यानंतर नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी तहकूब झालेली सभा अर्ध्या तासानंतर घेतली आणि त्यामध्ये 20 विविध प्रकारचे ठराव मंजूर करण्यात आले होते.

मात्र अर्ध्या तासानंतर घेतलेली ही सभा बेकायदेशीर असल्याचा दावा भाजपाने केला होता आणि या बाबत भाजपाचे गटनेते जयविंद्र कोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी 15 एप्रिलला पिठासीन अधिकारी म्हणून तहसिलदार उरण यांची नियुक्ती करून ही विशेष सभा घेण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT