उरण / जेएनपीए ः उरण नगरपालिकेच्या सत्तेसाठीची निर्णायक लढत शिगेला पोहोचली असताना संपूर्ण शहरात राजकीय तापमान प्रचंड वाढले होते.मंगळवारी ( 2 डिसेंबर ) नागरिकांनी मतदान केले.उरण नगर परिषदेत एकूण 67. 91 टक्के मतदान झाले. सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.मतदानानंतर कोणत्या पक्षाचा झेंडा नगरपालिका इमारतीवर फडकणार, याकडे सर्व उरणकरांचे डोळे लागले आहेत. या निवडणुकीचा निकाल न्यायालयाच्या निर्देशानुसार आता 21 डिसेंबरला लागणार आहे.तोपर्यंतउमेदवारांना धीर धरावा लागणार आहे.
एकूण 10 प्रभागांतून 21 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षा अशा एकूण 22 पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. नगराध्यक्षा पद महिला राखीव असल्याने सर्व पक्षांच्या गणितात मोठी उलथापालथ झाली होती.योग्य महिला उमेदवारांच्या शोधासाठी पक्षांना धावाधाव करावी लागली. या निवडणुकीत 13,311 पुरुष आणि 12,903 महिला असे मिळून 26,214 मतदार होते.यापैकी 17,895 मतदारांनी मतदान केले.
महाविकास आघाडीतर्फे भावना घाणेकर या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर मैदानात होत्या , तर भाजपतर्फे शोभा कोळी या कमळ या चिन्हावर उमेदवारी लढवली. शिवसेना शिंदे गटाच्या रुपाली ठाकूर हे धनुष्यबाण या निशाणीवर आणि एक अपक्षही रिंगणात असले तरी खरी लढत भावना घाणेकर व शोभा कोळी यांच्यातच झाली आहे.
उरणकरांच्या नजरा या दोन्ही महिला उमेदवारांच्या विजयाकडे खिळल्या आहेत.कोण नगराध्यक्ष बनणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरसेवकांच्या 21 जागांवर महाविकास आघाडी व भाजप यातच मुख्य सामना झाला आहे. प्रभागनिहाय मतदारसंख्या पाहता प्रभाग 1 ते 9 मधून प्रत्येकी 2 नगरसेवक, तर प्रभाग 10 मधून 3 नगरसेवक निवडले जाणार आहेत.
मागील निवडणुकीतील सत्तासंतुलन लक्षात घेता यंदाची निवडणूक अधिक तापलेली आणि चुरशीची होणार हे आधीच स्पष्ट झाले आहे. नेतेमंडळी अगोदरच विशेष लक्ष देऊन सज्ज झाली होती . मतदारांच्या मनात बदलाची अपेक्षा, नाराजी, विकासाच्या मागण्या सगळंच एका क्षणात मतदानयंत्रावर उमटले होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
उरण नगर परिषद निवडणुकीत एकूण 29 मतदान केंद्र होते या केंद्रावर शासनाचे 5 कर्मचारी व 1 पोलीस शिपाई तैनात होते. 4 पी आय, 31अधिकारी, 252 पोलीस कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त यावेळी निवडणुकीत होता. कुठेही यावेळी गैरप्रकार झालेला नाही. मतदान शांततेत कायदेशीररित्या लोकशाही मार्गाने संपन्न झाली.