कोप्रोली-उरण : पंकज ठाकूर
उरणच्या खोपटा कोप्रोली रस्त्याच्या कडेला असलेल्या खोपटा पाटील पाडा स्मशानभूमीच्या रस्त्याकडेला कोणीतरी अज्ञाताने सेंद्रिय रासायनिक घटक आहे जो सामान्यतः सनस्क्रीन क्रीम किंवा लोशनमध्ये वापरला जातो त्याच्या अनेक बॅग टाकून दिल्या असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे २०२८ ची एक्सपायरी तारीख या बॅगांवर असताना त्या फेकून का देण्यात आल्या आहेत आणि त्या रात्रीच्या अंधारातच का फेकल्या जातात याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. मागील दोन दिवस या स्मशानभूमीची स्ट्रीट लाईटची वायर कोणीतरी अज्ञात व्यक्ती तोडत आहे.
आज ही वायर दुरुस्त करण्यासाठी पाटील पाड्यातील नागरिक वायरमनला घेऊन गेले असताना त्यांना हा प्रकार दिसून आला आहे. त्यामुळे ज्या कोणी हे केमिकल असे रस्त्याच्या कडेला नैसर्गिक पाणी निचरा नाल्यात टाकले आहे याला प्रशासन शोधणार का नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
विशेष म्हणजे उद्या परवा या नाल्यात देखील भरतीचे पाणी येऊ लागेल त्या भरतीच्या निमित्ताने या गोण्यांतील केमिकल पाण्यात मिसळण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने प्रशासनाने याची तातडीने दखल घेण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
कंटेनर यार्ड आणि गोदामे यांना तर धरबंदच राहिलेला नाही. दिसली रिकामी जागा की टाका कंटेनर यार्ड अशी तालुक्याच्या पुर्व विभागाची तरी अवस्था झाली आहे. जेवढे अधिकृत त्यापेक्षा दुप्पट अनधिकृत कंटेनर यार्ड तालुक्यात उदयास आले आहेत. मात्र महसूल प्रशासनाला वार्षिक महसूल मिळत असल्याने अनधिकृत कंटेनर यार्डांचा बाल ही बाका केला जात नाही अशी तालुक्यातील अवस्था आहे. याचाच गैरफायदा काही इसम घेताना दिसत असल्याचे धडधडीत प्रकरण समोर आले आहे.
येथील खोपटा कोप्रोली रस्त्याच्या कडेला असलेल्या खोपटा पाटील पाड्याच्या स्मशानभूमी जवळील नैसर्गिक पाणी निचरा नाल्यात कोणीतरी अज्ञात इसमाने मोठ्या प्रमाणात आणून केमिकलच्या पिशव्या उघड्यावर टाकून दिल्या आहेत. रात्रीच्या अंधारात कोणीतरी टेम्पोने आणून हा सगळा प्रकार केला असणार असे मत जनतेतून बोलले जात आहे. ज्या सुमारे २५ ते ३० या केमिकलच्या बॅगा या ठिकाणी टाकण्यात आल्या आहेत त्यावरील असलेल्या पावती नुसार त्या बॅग मधील सामानाची एक्स पायरी ची तारीख ही २०२८ ची असल्याचे दिसून येत आहे.
एवढा वेळ हा माल खराब व्हायला असताना देखील तो आत्ताच या ठिकाणी का टाकण्यात आला असावा अशी शंका ग्रामस्थांना पडली आहे. नेमका हा माल या ठिकाणी कोणी टाकला याचा कोणताही सुगावा लागलेला नाही मात्र त्या गोण्यांची पाहणी केली असता त्यावर इंग्रजीमध्ये बटाईल मेथॉक्सी डीबेंझोल मिथेन अवेबेंझोन असे नाव आहे.
प्रत्येक गोणी २५ किलोची आहे. या सर्व गोणी या ठिकाणी टाकल्या आहेत त्याला कोणत्याही प्रकाराचा वास येत नाही मात्र परवा येत आलेल्या एकादशी निमित्ताने समुद्राला भरती येण्याची शक्यता असल्याने हे सर्व केमिकल नाल्यातील पाण्यात मिक्स होण्याची शक्यता आहे. नाल्यातून ते थेट समुद्रात देखील जाऊ शकते.