

महाड : महाड तालुक्यातील भांदेकोंड परिसरात मुख्य रहदारीच्या रस्त्यावर भरदिवसा बिबट्याचे दर्शन झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. रस्त्याशेजारील एका उंच भागावर बिबट्या बिनधास्तपणे बसलेला असताना स्थानिक रहिवाशी सागर राखाडे यांनी प्रसंगावधान राखून आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ चित्रीत केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यामुळे भांदेकोंड व लगतच्या परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी बिबट्यांचा मुक्त संचार
रायगड जिल्हा हा सह्याद्रीच्या पर्वतरांगा, दाट जंगले आणि अभयारण्यांनी वेढलेला असल्याने गेल्या काही वर्षांत अनेक तालुक्यांमध्ये बिबट्याचा वावर वारंवार नोंदवला गेला आहे. महाड तालुक्यांतील भांदेकोंड व्यतिरिक्त यापूर्वी किल्ले रायगड परिसर, वरंध घाट आणि पोलादपूरच्या सीमावर्ती ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर वारंवार नोंदवला गेला आहे.
माणगाव तालुक्यांतील निजामपूर विभागातील जीते गावाच्या मुख्य रस्त्यावर बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला असून, पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अलिबाग तालुक्यात नागाव आणि आक्षी या समुद्रकिनारपट्टीच्या भागातील नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याचे समोर आले होते.
नेरळ - माथेरान परिसरात नेरळ येथून माथेरानकडे जाणाऱ्या घाटात व वनक्षेत्रातील रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले आहे. म्हसळा तालुक्यातील संदेरी गावाजवळील शेतात बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. पेण तालुक्यांतील वाशी, हमरापूर आणि रोह्यातील जंगल भागालगतच्या गावांमध्ये रात्रीच्या वेळी बिबट्या रस्त्यावर किंवा शेतात दिसल्याच्या घटना घडल्या आहेत.
वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी
नैसर्गिक अधिवास कमी होणे आणि अन्नाच्या शोधात बिबटे मानवी वस्तीकडे वळत असल्याने शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भांदेकोंड येथील या ताज्या घटनेनंतर वनविभागाने तातडीने गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वनविभाग याप्रकरणी काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.