Uran gas shortage Pudhari
रायगड

Uran gas shortage: गॅससाठी ग्राहकांच्या रखरखत्या उन्हात रांगा; उरणमध्ये प्रशासकीय नियोजनाचा उडाला बोजवारा

सर्वसामान्यांचे हाल

पुढारी वृत्तसेवा

उरण: उरणमधील शकुंतला भारत गॅस एजन्सीचा परवाना निलंबित केल्यानंतर निर्माण झालेला गॅस तुटवडा आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. घरगुती सिलिंडर मिळवण्यासाठी उरण चारफाटा येथे भर उन्हात ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून, प्रशासनाच्या नियोजनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शकुंतला गॅस एजन्सीकडून होणारी ग्राहकांची अडवणूक, उद्धट वर्तणूक आणि बेकायदा सिलिंडर विक्रीच्या तक्रारींची दखल घेत तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी या एजन्सीवर मोठी कारवाई केली. बीपीसीएलने या एजन्सीचा परवाना निलंबित करून पुरवठा बंद केला आहे. मात्र, या कारवाईनंतर उरणमधील सुमारे 20 हजार ग्राहकांच्या गॅस पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उरण चारफाटा येथे पहाटे 7 वाजेपासूनच नागरिक रिकामे सिलिंडर घेऊन रांगेत उभे राहत आहेत. दुपारी 2 वाजेपर्यंत नंबर लागत नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ‌‘तहान-भूक विसरून उन्हात उभे राहण्याची वेळ आमच्यावर आली आहे,‌’ अशी भावना एका त्रस्त ग्राहकाने व्यक्त केली.

तहसील कार्यालयाने ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल येथील पनवेल गॅस सर्व्हिस आणि सुविधा गॅसकडे कनेक्शन वर्ग केले असून 23 एप्रिलपासून पुरवठा सुरू झाल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. गावात पुरवठा करण्यासाठी अद्याप पुरेशा गाड्या नसल्याने गावागावात सिलेंडर पोहोच होत नाहीत.

ग्राहकांना स्वतःहून रांगेत उभे राहून सिलिंडर न्यावे लागत आहेत. पनवेल गॅस सर्व्हिसचे कार्यालय आता नवीन पत्त्यावर (सेक्टर 52) स्थलांतरित झाल्याने ग्राहकांचा गोंधळ अधिकच वाढला आहे.वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे उरणकर हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने घरपोच गॅस सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

ग्राहकांचा गोंधळ

गावात पुरवठा करण्यासाठी अद्याप पुरेशा गाड्या नसल्याने गावागावात सिलेंडर पोहोच होत नाहीत. ग्राहकांना स्वतःहून रांगेत उभे राहून सिलिंडर न्यावे लागत आहेत. पनवेल गॅस सर्व्हिसचे कार्यालय आता नवीन पत्त्यावर (दौनागिरी, सेक्टर 52) स्थलांतरित झाल्याने ग्राहकांचा गोंधळ अधिकच वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT