Uran Flamingo Pudhari
रायगड

Uran Flamingo: नैसर्गिक जलमार्ग रोखल्याने उरणमध्ये फ्लेमिंगोंच्या अधिवासावर संकट

टी. एस. चाणक्य परिसरातील 14 हेक्टर आंतरज्वारीय क्षेत्र अतिक्रमणाच्या विळख्यात; पर्यावरण कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

उरणः एकेकाळी हजारो स्थलांतरित फ्लेमिंगो पक्षांचे हक्काचे खाद्यस्थळ असलेल्या टी. एस. चाणक्य परिसरातील 14 हेक्टर आंतरज्वारीय (भरती-ओहोटीचे क्षेत्र) जलक्षेत्राला सध्या अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. भरती-ओहोटीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण केल्याने या परिसंस्थेचे आरोग्य धोक्यात आले असून, पर्यावरण कार्यकर्त्यांनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे.

ठाणे खाडीतील पाणी या जलक्षेत्रात येण्यासाठी असलेले अरुंद ज्वारीय कालवे लाकडी अडथळे उभारून बंद करण्यात आले आहेत. माशांच्या तलावांसाठी करण्यात आलेल्या या अतिक्रमणामुळे पाण्याची नैसर्गिक हालचाल थांबली आहे. परिणामी, येथे पाणी साचून राहिल्याने संपूर्ण तलावावर शैवालांचा जाड थर पसरला आहे. हे जलसाठा ठप्प झाल्याचे आणि परिसंस्था मृत होत असल्याचे लक्षण असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

या जलक्षेत्राचे महत्त्व केंद्र सरकारच्या नॅशनल वेटलँड इन्व्हेंटरीमध्ये नोंदवलेले असूनही प्रशासकीय स्तरावर दुर्लक्ष होत आहे. नॅटकनेक्ट फाउंडेशनने याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. राज्याच्या मँग्रोव्ह सेलने हा परिसर संरक्षणासाठी ताब्यात घेण्याचा प्रस्ताव दिला होता, जो सिडकोने फेटाळला. नवी मुंबई महानगरपालिकेनेही या ठिकाणाचा पर्यावरण पर्यटन सर्किटमध्ये समावेश करण्याची विनंती केली होती, मात्र सिडकोकडून त्यास प्रतिसाद मिळालेला नाही.

हे 14 हेक्टरचे महत्त्वाचे आंतरज्वारीय क्षेत्र आहे. कालव्यांमध्ये लाकडी अडथळे उभारून भरतीचे पाणी रोखले आहे. त्यामुळे अन्नाचा अभाव आणि शैवालांच्या वाढीमुळे फ्लेमिंगोंची पाठ फिरविल्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून जलमार्गांचे तातडीने पुनरुज्जीवन करावे अशी मागणी करण्यात येत आहे. ‌‘सिडको ना स्वतः अतिक्रमणे हटवत आहे, ना इतर संस्थांना हे जलक्षेत्र जतन करण्याची परवानगी देत आहे,“ असा आरोप सागर शक्तीचे नंदकुमार यांनी केला आहे. आता केंद्र सरकार यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“सध्या या जलक्षेत्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अतिक्रमण आणि बंद केलेले जलमार्ग यामुळे ही जागा आता फ्लेमिंगोंना आधार देण्यास सक्षम राहिलेली नाही.“
बी. एन. कुमार, संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT