जेएनपीए ः दिवाळीचे औचित्य साधून उरणमध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रंगवल्ली कला दर्शन संस्थेने मोफत रांगोळी प्रदर्शन भरविले आहे. हे प्रदर्शन 30 ऑक्टोबरपर्यंत सलग आठ दिवस आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनात विविध मान्यवरांची व्यक्तिचित्रे हुबेहूब रेखाटून असून हे रेखाचित्र पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
स्थानिक नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी व हौशी होतकरू कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हे रांगोळी प्रदर्शन भरविण्यात येत असल्याची माहिती कलाकारांनी दिली. प्रदर्शनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या तथा महाराष्ट्र राज्य कला शिक्षक संघाच्या अध्यक्षा प्रियंवदा तांबोटक यांच्या हस्ते करण्यात आले.
आयोजित करण्यात आलेल्या भव्य रांगोळी प्रदर्शनात बाळासाहेब ठाकरे, श्रीकृष्णाची विविध रूपे, गणपती, स्वामी समर्थ, साधुसंत, सिंधूताई सपकाळ, दिवंगत ज्येष्ठ कलाशिक्षक नंदकुमार साळवी, नाणी टाकसाळीचे जनक वसंत गावंड आदींचा समावेश आहे. वन्य जीवांच्या वाढत्या हत्या, शिकार चिंतेचा विषय बनला आहे. पक्षी, प्राण्यांची चित्रे रेखाटून ’आम्हालाही जगू द्या’चा संदेश दिला आहे.यात सामाजिक व पर्यावरण विषयक संदेश देणाऱ्या रांगोळीचा मोठा समावेश आहे.
हेच ते रंगावलीचे चित्रकार
सिद्धार्थ नागवेकर, स्वप्नाली मंचेकर, नवनीत पाटील, संतोष पाटील, राजेश नागवेकर, ध्रुव म्हात्रे, सत्या कडू, आतिष मंचेकर, स्वप्नाली मणचेकर, पार्थ म्हात्रे, अमरनाथ पाटील, चंदन गडगे, संतोष डांगरे, कीर्तीराज म्हात्रे, वैष्णवी जाधव, तेजस पाटील, विद्या वरे, अविनाश कदम आदी कलाकारांनी थ्रीडी, उठावाची, पोर्ट्रेट रांगोळ्या साकारल्या आहेत.या रांगोळ्या रसिक प्रेषकांना मंत्र मुग्ध करीत आहेत.संस्कार भारती तर्फे मोफत रांगोळी बेसिक कोर्स ही या दरम्यान विद्यार्थी, नागरिकांना शिकविले जातो.