Vegetable Price Hike
पनवेल : अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले त्याचा थेट परिणाम पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्याच्या विक्रीवर दिसून येत आहे. नेहमी खरेदीदारांनी गजबजलेल्या बाजारपेठेत सोमवारच्या सकाळपासून शुकशुकाट दिसून आला. विक्रेत्यांचे स्टॉल्स उभे होते, पण ग्राहकांची वर्दळ मात्र अत्यल्प होती.
गेल्या काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी, बाजारात येणार्या भाज्यांचे प्रमाण कमी झाले आणि उपलब्ध भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले. सध्या वांगी, टोमॅटो, भेंडी, फुलकोबी, कोथिंबीर, कांदा, मिरची या भाज्यांचे दर गगनाला भिडले असून, त्यामुळे सामान्य ग्राहकांचे बजेट मात्र कोसळले आहे. सकाळी सहा वाजताच आम्ही स्टॉल उभा केला, पण अजून एकही ग्राहक भाजी घेण्यासाठी थांबलेला नाही. दरवाढ झाली आहे हे खरे, पण त्यातही नुकसान होतंय, असा सूर विक्रेत्यांमधून ऐकायला मिळाला.
मिरची : 100 रुपये
शेवग्याची शेंग : 90 रुपये
वांगी : 80 रुपये
भेंडी : 80 रुपये
फुलकोबी : 80 रुपये
टोमॅटो : 60 रुपये
कोथिंबीर : 40 पेंडी
बटाटा : 40 रुपये
दुसरीकडे, ग्राहक मात्र दरवाढीने हतबल झाले आहेत. एका महिला ग्राहकाने सांगितले, दोडका 160 रुपये किलो, वांगी 80 रुपये किलो, मिरची 100 रुपये किलो आणि टोमॅटोही 60 रुपये किलो आहेत. या भावात घर चालवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणातच भाजी घेतोय, काही वेळा आलं-लसूण पेस्ट, मसाल्याच्या सहाय्याने जुन्या भाज्यांचाच उपयोग करत आहोत.
आमच्याकडील भाजीपाला एक दिवस उशिरा गेला, तर सडतो, कुजतो. जर ग्राहक येत नसतील, तरीही भाजीपाला वाया जातो. आम्ही कुठे आणि कशाला न्यायची ही भाजी? रोजच्या रोज भाजी विकली गेली पाहिजे, तरच घर चालते.संतोष वर्मा, भाजी विक्रेता