Rising Vegetable Prices
नवी मुंबई : पावसामुळे शेताच्या बांधावरच शेतमाल खराब झाल्याने सडला आणि फेकून देण्याची वेळ भाजी उत्पादक शेतकर्यांवर आली. मात्र त्याचा फटका मुंबई एपीएमसीच्या घाऊक भाजीपाला बाजाराला बसला असून आवक 40 टक्क्यांनी घटली. यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाल्याची माहिती संचालक आणि घाऊक व्यापारी शंकर पिंगळे यांनी दिली.
आजही किरकोळ बाजारात सर्वच भाजीपाला किलोला 100 ते 120 रुपयांवर पोहचला. तर पालेभाज्यांचे दर 40 ते 50 रुपये एवढे आहेत. विशेष म्हणजे बाजारात 70 टक्के शेतमाल सध्या मध्यम दर्जाचा येतो. जो भिजलेला, काही प्रमाणात डागी माल म्हणून ओळखला जातो. त्याचे दरही कमी असतात. तोच शेतमाल किरकोळ व्यापारी एपीएमसीतून खरेदी करुन 100 ते 120 रुपये किलोच्या भावाने ग्राहकांच्या माथी मारतात.
30 टक्के उत्तम प्रतीचा शेतमाल सध्या एपीएमसीत येत असल्याची माहिती व्यापारी पिंगळे यांनी दिली. पावसाचा मोठा फटका शेतकर्यांना बसला आहे. काढणीवर आलेला शेतमाल टोमॅटो, ढोबळी मिरची, फ्लॉवर, कोबी, गवार, कारली, दुधी भोपळा, शिराळीसह इतर सर्व भाजीपाला शेतातच खराब झाल्याने तो बांधावरच फेकून देण्यात आला होता.
त्यामुळे आवक घटल्याचे पिंगळे म्हणाले. पावसाळा कालावधीत कमी अधिक पाऊस झाल्यानंतर अशीच स्थिती निर्माण होईल. याला शेतकरी, व्यापारी काहीही करु शकणार नाही. मात्र त्याचा फायदा किरकोळ व्यापारी घेताना दिसून येतात. किरकोळ बाजारात भाज्यांचे दर 80 ते 120 रुपये किलो आहेत. तर घाऊकला हेच दर 40 ते 60 रुपये किलो आहेत. तर पालेभाज्यांचे दर 6 ते 12 रुपये जुडी एवढे असले तरी किरकोळला मात्र 40 ते 50 रुपये जुडी असल्याने ही लुटमार आणखी किती दिवस चालणार आहे. असा प्रश्न उपस्थित केला जातो.