Umte Dam Water Crisis Pudhari
रायगड

Umte Dam Water Crisis: उमटे धरण यावर्षी तरी गाळमुक्त होणार का ?

कंत्राटदार मिळत नसल्याने काम ठप्प; दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरीकांची चेष्टा थांबवून खराखुरा ठेकेदार नेमून गाळाचा व पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी उमटे धरण संघर्ष ग्रुपतर्फे करण्यात आली आहे.तसे निवेदन ग्रुपचे ॲड राकेश पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांना निवेदनदिले आहे.

उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या 77 गावातील नागरिकांच्या पिण्याच्या शुध्द पाण्याचा स्वप्न भंग होण्याच्या मार्गावर आहेत.उमटे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना आणि गाळ गाळण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. धरणाच्या संरक्षण भितींची दुरूस्ती आणि साचलेला गाळ काढण्याचे घोंगडे कंत्राटदार मिळत नसल्याने भिजत पडले आहे.

जीवन प्राधिकारणाने धरणाची दुरुस्ती आणि गाळ काढण्यासाठी ई निविदा प्रसिध्द केली होती. या निविदा एकदा नाहीतर तब्बल चार वेळा प्रसिध्द केल्या होत्या. तीन वेळा निविदा जाहीर करूनही ठेकेदारांनी निविदाच भरल्या नाहीत आणि चौथ्यांदा दोन ई निविदा आल्या मात्र त्यांच्याकडे अपूर्ण कागदपत्रे असल्यामुळे त्यांना दुरूस्ती आणि गाळ काढण्याचे कंत्राट देता आले नाही. यामुळे उमटे धरणाच्या संरक्षण भिंतीची दुरुस्ती आणि साचलेला गाळ काढण्याचा प्रश्न कंत्राटदार मिळत नसल्याने अंधातरीच राहीला असल्याचे निदर्शनास आणले आहे. त्यामुळे रणाच्या पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असणाच्या नागरिकांना पुन्हा एकदा गाळ मिश्रीत पाणी प्यावे लागणार आहे.

पहिल्या तीन निविदांमध्ये उमटे धरणाची दुरुस्ती आणि गाळ काढण्यासाठी एकही कंत्राटदाराने पुढाकार घेतलेला आढळत नाही. चौथ्या ई निविदेच्या प्रसिध्दीनंतर दोन कंत्राटदारांनी हे काम घेण्यासाठी आपल्या ई निविदा दाखल केल्या मात्र या दोन्ही कंत्राटदारांकडे कामाच्या अंदाजीत रक्कमेच्या नियमावलीपोटी आवश्यक असणारी कागदपत्रे कंत्राटदारांना निविदेसोबत जोडता आली नाहीत यामुळे कागदपत्र पळताळणीमध्ये दोन्ही कंत्राटादार अपुच्या कागदांमुळे त्यांच्या निविदा बाद ठरविण्यात आल्या. यामुळे उमटे धरणाच्या डागडुजी आणि गाळ काढण्याचा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दप्तरी अडकून राहीला आहे.

लोकांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी उमटे धरण संघर्ष ग्रुप च्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर शासनाने गाळ आणि दुरूस्तीसाठी ई निविदा काढण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांच्या या निर्णयाचा काहीही उपयोग झाला नाही. यामुळे आजही उमटे धरणाच्या माध्यामांतून पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या गावांना दुषित पाणीपुरवठा होत आहे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठीची सरकारची भूमिका फसवी आहे, रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात धरण असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग माणगाव गाळ काढण्याची निविदा काढते? धरणाचा गाळ काढण्यासाठी एकही लायक ठेकेदार मिळत नसेल तर शासनाने निविदेच्या अटीं व शर्ती मध्ये बदल करून गाळ काढावा, ऐतिहासिक चवदार तळ्याच्या संघर्षाने शंभरी गाठली असतानाही जर पाण्याचा प्रश्न सुटत नसेल तर सरकारच अपयश म्हणावं लागेल
ॲड. राकेश पाटील उमटे धरण संघर्ष ग्रुप, रायगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT