Clay Pot Demand Pudhari
रायगड

Clay Pot Demand: उन्हाच्या तडाख्यात मातीच्या माठांचीच क्रेझ; गरिबांचा फ्रीज‌’ ठरणाऱ्या पारंपरिक माठांना नागरिकांची आजही पसंती

विजेशिवाय किंवा कोणत्याही इंधनाशिवाय पाणी गार ठेवणारे माठ हे ‌‘गरिबांचा फ्रिज‌’ म्हणून ओळखले जातात.

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे: वाढत्या उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळवण्यासाठी आजही नागरिक नैसर्गिकरित्या थंडगार पाणी देणाऱ्या पारंपरिक मातीच्या माठांनाच पसंती देत आहेत. विजेशिवाय किंवा कोणत्याही इंधनाशिवाय पाणी गार ठेवणारे माठ हे ‌‘गरिबांचा फ्रिज‌’ म्हणून ओळखले जातात.

उन्हाळा सुरू होताच घराघरांत ठेवणीतले जुने माठ बाहेर काढून स्वच्छ करून वापरण्याची परंपरा आजही कायम आहे. मात्र अनेक माठ तुटफुट झाल्याने नव्या माठांसाठी नागरिकांना कुंभारवाड्यांकडे धाव घ्यावी लागत आहे.

दरम्यान, मागील काही वर्षांत बाजारात पर राज्यातील तुलनेने स्वस्त आणि आकर्षक माठ मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. हे माठ फेरीवाल्यांकडून अगदी घरपोच उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचा त्याकडे ओढा वाढला असून स्थानिक कुंभारांच्या पारंपरिक व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे.

150 ते 200 रुपयांत नळासह मिळणारे हे माठ स्वस्त असले तरी त्यांच्या गुणवत्तेत आणि स्थानिक हात बनावटीच्या माठांमध्ये मोठा फरक असल्याचे स्थानिक कारागीर सांगत आहेत.

स्थानिक कुंभारांच्या मते, येथील भाट मातीपासून बनविलेले माठ अधिक जाडसर असून योग्य उष्णतेत भाजले जातात. त्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या झिरप्यामुळे आतले पाणी अधिक गार राहते.

उलट पर राज्यातील व्यावसायिक उत्पादनातील माठांमध्ये झिरपा कमी असल्याने पाणी अपेक्षित तेवढे थंड राहत नाही. स्थानिक हाताने बनविलेले माठ दिसायला थोडे वेडेवाकडे असले तरी त्यांच्या नैसर्गिक थंडाव्याला ग्राहक आजही पसंती देत आहेत.

मात्र माती, सरपण, मजुरी आणि इतर साहित्यांच्या वाढलेल्या दरांमुळे स्थानिक माठांची किंमत काहीशी जास्त असल्याचे कुंभार सांगतात. त्यामुळे नागरिकांनी केवळ स्वस्ताई न पाहता स्थानिक कारागिरांच्या कष्टांची दखल घेऊन त्यांच्या माठांना प्राधान्य द्यावे, तसेच हा पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी सहकार्य करावे, अशी भावनिक विनंती स्थानिक कुंभारांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT