Unseasonal Rain : पनवेलकरांची उकाड्यापासून सुटका…! सकाळच्या उष्‍म्‍यानंतर दुपारी आकाश फाटलं, विजांच्या गडगडाटात अवकाळी पावसाची हजेरी File Photo
रायगड

Unseasonal Rain : पनवेलकरांची उकाड्यापासून सुटका…! सकाळच्या उष्‍म्‍यानंतर दुपारी आकाश फाटलं, विजांच्या गडगडाटात अवकाळी पावसाची हजेरी

उकाड्याने त्रस्त झालेल्या पनवेलकरांसाठी हा पाऊस एक सुखद गारवा घेऊन आला.

पुढारी वृत्तसेवा

Thunderstorms and rain in Panvel

पनवेल : विक्रम बाबर

गेल्या काही दिवसांपासून तापमानाने अक्षरशः कहर केला होता. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा आणि दमट हवामान यामुळे नागरिक हैराण झाले होते. पण आज दुपारी सुमारे बारा वाजता आकाश अचानक गडगडू लागलं, विजा कडाडू लागल्या आणि काही क्षणांतच जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त झालेल्या पनवेलकरांसाठी हा पाऊस एक सुखद गारवा घेऊन आला.

रेल्वे स्थानक, मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकांत अचानक आलेल्या पावसामुळे गोंधळ उडाला. दोन चाकी वाहनधारकांची त्रेधा उडाली; काही जणांनी झाडाखाली, तर काहींनी बस स्टॉपचा आसरा घेतला. अचानक आलेल्या या पावसाने रस्त्यांवर वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली, परंतु अनेकांनी याचा मनमुराद आनंदही घेतला.

पावसाच्या सरींसोबत आलेल्या गार वाऱ्याने वातावरण थोडं शांत झालं. कार्यालयातून निघणारे कर्मचारी, विद्यार्थ्यांचे गट, आणि घराघरांतील लोक बाल्कनीत उभे राहून पावसाचा आनंद घेताना दिसले. काही लहान मुले तर सरळ रस्त्यावर उतरून भिजत होती, त्यांच्या हास्याने वातावरण अजूनच प्रसन्न झालं.

एक स्थानिक नागरिक म्हणाले, "काल रात्री घामाघूम झालो होतो. एसी चालू करूनही गारवा वाटत नव्हता. पण आजचा हा पाऊस म्हणजे निसर्गाची भेट वाटली. काही वेळासाठी का होईना, पण पनवेलचा उकाडा गेला."

मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडीही झाली. हवामान विभागाने याआधीच काही भागांत मे महिन्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली होती. ही स्थिती येत्या काही दिवसांत पुन्हा निर्माण होऊ शकते. वातावरणातील बदल आणि ढगाळ हवामान पाहता, पुढील दोन-तीन दिवस थोड्या फार सरींचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आजचा पाऊस हा केवळ हवामानातील बदल नव्हे, तर उकाड्याने हैराण झालेल्या पनवेलकरांसाठी दिलासा ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT