रायगड : नाते इलियास ढोकले
मागील काही दिवसांपासून महाड परिसरात शासकीय वेधशाळा, स्थानिक प्रशासन, पुरातत्व विभागामार्फत घेण्यात आलेल्या सूचनांचा विचार करून रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी किल्ले रायगडवर जाणारा पायरी मार्ग 31 जुलै पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेल्या आदेशामध्ये किल्ले रायगड परिसरात रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने निर्माण झालेली स्थिती व या परिसरातील असणारी अपघातांची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्याबाबत प्राधान्याने विचार करून ही किल्ले रायगड पायरी मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. हा बंदचा कालावधी 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आला असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.
वेधशाळेमार्फत आगामी काळात रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. हे लक्षात घेऊन तसेच पायरी मार्गावर अपघाताची शक्यता वर्तविण्यात आल्याने किल्ल्यावर येणाऱ्या हजारो शिवभक्त पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान किल्ले रायगडावर चित्त दरवाजा व नाणे दरवाजा येथे स्थानिक पोलिसांकडून योग्य ती काळजी घेतली आहे. शिवभक्त गडावर जाणार नाहीत यासाठी बॅरिगेटिंग करावी असेही या आदेशामध्ये सुचविण्यात आले आहे.
दरम्यान किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग बंद झाला असला तरीही शासनाने रोपवे प्रशासनाला त्यांची यंत्रणा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे गडावर जाण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे.